शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
राज्यातील मंदिरांमध्ये आठवड्यातून एकदा महाआरती करण्याचा ऐतिहासिक ठराव साईंच्या शिर्डीत करण्यात आला. शिर्डी येथे आयोजित राज्यस्तरीय मंदिर न्यास परिषदेत हा ठराव करण्यात आला आहे. महाराष्ट्र मंदिर महासंघाच्यावतीने दोन दिवसीय अधिवेशन शिर्डीत घेण्यात आले. या अधिवेशनासाठी राज्यभरातील साडेसातशे मंदिराचे एक हजाराहून अधिक विश्वस्त सहभागी झाले होते. अधिवेशनाच्या दुसर्या दिवशी राज्यातील सर्व मंदिरांमध्ये आठवड्यातून एकदा सामूहिक महाआरती करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. या निर्णयाला उपस्थित असलेल्या सर्व विश्वस्तांनी अनुमोदन देत हा ठराव पास केला. हिंदू धर्माला एकत्रित आणण्यासाठी हा ठराव करण्यात आला असून याबरोबरच अनेक ठराव देखील या अधिवेशनात पारित करण्यात आल्याचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी सांगितले.
अनेक मंदिरांवर सरकारी नियंत्रण असून हे नियंत्रण हटविण्याची मागणी या अधिवेशनात करण्यात आली. वक्फ बोर्डाने काबीज केलेल्या मंदिरांच्या जागा देखील सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा ठराव या अधिवेशनात पारित करण्यात आल्याचे नाशिक येथील काळाराम मंदिराचे महंत सुधिरदास यांनी सांगितले. दोन दिवस सुरू असलेल्या अधिवेशनात राज्यभरातील एक हजाराहून अधिक विश्वस्त सहभागी झाले होते. मंदिरांचे होणारे सरकारीकरण रोखावे, वक्फ बोर्डाने हस्तांतरित केलेल्या जागांचा निर्णय घ्यावा यासह मंदिरांच्या जागा बळकावण्याचा होत असलेला प्रयत्न टाळण्यासाठी राज्य सरकारने नवीन कायदा करावा, असे विविध ठराव यावेळी करण्यात आले. या सर्व गोष्टींसाठी हिंदूंनी एकत्र येण्यासाठी आठवड्यातून एकदा सामूहिक महाआरती करण्याचा ऐतिहासिक ठराव या अधिवेशनात मंजूर करण्यात आला.