Monday, March 16, 2026
Homeब्रेकिंग न्यूजशिरवाडकरांच्या गावी दहा हजार झाडे लावणार - अभिनेते सयाजी शिंदे

शिरवाडकरांच्या गावी दहा हजार झाडे लावणार – अभिनेते सयाजी शिंदे

कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या ‘गोदावरी गौरव पुरस्कार’ वितरणप्रसंगी निर्धार

- Advertisement -

नाशिक | प्रतिनिधी Nashik

कुसुमाग्रजांच्या स्मृती जपण्यासाठी देवराईतर्फे त्यांच्या शिरवाडे या गावी आगामी पाच वर्षांत १० हजार झाडे लावण्याचा निर्धार अभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केला. कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे आयोजित गोदावरी गौरव पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी अभिनेते शिंदे बोलत होते. यावेळी समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष, ज्येष्ठ कवी व साहित्यिक वसंंत डहाके यांच्या हस्ते गोदावरी गौरव या पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महापौर हिमगौरी आडके उपस्थित होत्या.

भारतातील जागतिक कीर्तीचे रसायन अभियांत्रिकी शास्त्रज्ञ डॉ.अनिरुद्ध पंडित,(विज्ञान), महाराष्ट्रातील साहसी युवकांसाठी प्रेरणास्थान ठरलेले आशिष माने (साहस), चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी (चित्रकला),पडद्यावर कडक, रौद्र भूमिका साकारणारे, प्रत्यक्ष आयुष्यात मात्र पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्ते अभिनेते सयाजी शिंदे (लोकसेवा), नाट्य अभिनेते प्रशांंत दामले (नाट्य) आणि उस्ताद उस्मान खान (संगीत) हे पुरस्काराचे मानकरी होते. यावेळी सर्व पुरस्कार्थींनी कुसुमाग्रजांच्या नावाने दिला जात असणार्‍या पुरस्काराबाबत कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी बोलतांना अभिनेते सयाजी शिंदे यांनी सांगितले की, सरकारमध्ये प्रोटोकॉलच्या नावाने कामे दाखविली जातात. त्यामुळे नुकसान होते. नुकसान झालेला पैसा हा आपलाच वाया जातो.ठिकठिकाणी देवळे अतिक्रमण करून उभारले जातात मात्र वाचनालय कुठे उभे राहिलेली दिसत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. आज खेडेगावात देखील मराठी शाळांची स्थिती बिकट होत चालली आहे. हे कशामुळे ढासळले याचा विचार होणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात शिवरायांच्या काळापासून असलेल्या केवळ ३५० ते ४०० देवराई शिल्लक आहेत.मला आयुष्यात ४० ऐवजी किमान १०० देवराई उभारायच्या आहेत.
यावेळी बोलतांना पुरस्कारार्थीं आशिष माने यांनी एव्हरेस्ट व लोथसे या जगातील चौथ्या मोठे शिखर चढतांनाचे अनुभव कथन केले.यावेळी त्यांनी अवघड ठिकाणी कुसुमाग्रजांच्या कवितांच्या ओळींची आठवण करून दिली.

रसायन अभियांत्रिकी शास्त्रज्ञ डॉ.अनिरुद्ध पंडित यांनी सांगितले कि,विज्ञान म्हणजे काही करायचे असेल तर समाजाविरोधात जाऊन साहस करावे लागते.वैज्ञानिक म्हणून मला गौरव आहे परंतु आधी मी शिक्षक आहे.यावेळी डॉ.पंडित यांनी पुरस्कारात मिळालेले २१ हजार रुपये कुसुमाग्रज प्रतिष्ठानला देणगी म्हणून दिली.

चंद्रमोहन कुलकर्णी यांनी सांगितले की, आजची शिक्षण व्यवस्था कोसळली आहे विशेषतः कला विभागाची. चित्रकला महाविद्यालयाला चित्रकला बंधनकारक केली पाहिजे.चित्रकलेकडे उदासीनतेने बघणारे लोक समाजात आहेत.कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे चित्रकला क्षेत्रात बरबादी झाली असल्याची खंत यावेळी त्यांनी व्यक्त केली.
उस्ताद उस्मान खान यांनी सांगितले की, वयाच्या ८६ व्या वर्षी कुसुमाग्रजांच्या नावाने पुरस्कार मिळाल्याचा अभिमान वाटतो. प्रतिष्ठानतर्फे मला बोलवा मी सतार घेऊन येईल आणि त्यापोटी मला कसलीही अपेक्षा नाही.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष कवी प्रकाश होळकर, अ‍ॅड. अजय निकम, राजेंद्र डोखळे, सल्लागार डॉ. दिलीप धोंगडे , लोकेश शेवडे, विलास लोणारी, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार आदी प्रयत्नशील होते. सुत्रसंचलन स्वानंद बेदरकर यांनी तर दिलीप धोंडगे यांनी आभार मानले.

नाशकात नाट्यगृह उभारा : दामले
नाशकात नवीन नाट्यगृह उभारा आणि ते उभारत असतांना आर्किटेक्टचा खर्च वाचविण्यासाठी कालिदास कलामंदिराचा आराखडा घ्या अशी मागणी यावेळी अभिनेते प्रशांत दामले यांनी महापौर हिमगौरी आडके यांच्याकडे केली.

ताज्या बातम्या