Tuesday, April 28, 2026
HomeराजकीयThane Politics : आणखी एका ठिकाणी 'आघाडीत बिघाडी'! काँग्रेसची 'एकला चलो रे'ची...

Thane Politics : आणखी एका ठिकाणी ‘आघाडीत बिघाडी’! काँग्रेसची ‘एकला चलो रे’ची भूमिका

ठाणे । Thane

मुंबईपाठोपाठ आता आणखी एका महानगरपालिकेतही महाविकास आघाडीला मोठे भगदाड पडले आहे. जागावाटपावरून निर्माण झालेला तिढा न सुटल्याने ठाणे काँग्रेसने आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यावर मित्रधर्माचे पालन न केल्याचा आरोप केला आहे.

- Advertisement -

ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आणि भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडी एकत्र लढेल, अशी चिन्हे होती. मात्र, आघाडीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) समावेश झाल्याने काँग्रेस नाराज झाली आहे. ठाणे काँग्रेसचे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी स्पष्ट केले की, “ज्या मनसेला कालपर्यंत विरोध होता, ती आज मविआ नेत्यांना प्रिय झाली आहे. मराठी मतांचे विभाजन टाळण्यासाठी आम्ही नमती भूमिका घेतली होती, पण आम्हाला सन्मानजनक जागा नाकारण्यात आल्या.”

विक्रांत चव्हाण यांनी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर अत्यंत तिखट शब्दांत टीका केली आहे. “कठीण काळात आम्ही राजन विचारे आणि जितेंद्र आव्हाड यांच्या पाठीशी उभे राहिलो, त्यांना मदत केली. मात्र, आज तेच आमच्या जिवावर उठले आहेत,” असे चव्हाण म्हणाले. बैठकीत काँग्रेसकडे कार्यकर्ते आणि पैसे नाहीत, असे म्हणून हिणवण्यात आल्याचा खळबळजनक दावाही त्यांनी केला. आव्हाडांच्या या भूमिकेमुळे आता काँग्रेस त्यांच्या विरोधातही उमेदवार उभा करणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

काँग्रेसने सुरुवातीला ३५ जागांची मागणी केली होती, जी नंतर चर्चेअंती २३ जागांपर्यंत खाली आणली. मात्र, राष्ट्रवादी, शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे यांपैकी कोणीही काँग्रेसला इतक्या जागा सोडण्यास तयार नव्हते. काँग्रेसने जागावाटपासाठी ४८ तासांचा अल्टिमेटम दिला होता, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने अखेर काँग्रेसने स्वबळावर लढण्याचा निर्णय जाहीर केला. मनसेला एका प्रभागात दोन-दोन जागा दिल्या जात असताना काँग्रेसला डावलले जात असल्याचा आरोप स्थानिक कार्यकर्त्यांनी केला आहे.

काँग्रेसच्या या आक्रमक पवित्र्यावर जितेंद्र आव्हाड यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. ठाण्यातील जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. “जर काही गैरसमज झाले असतील, तर आम्ही एकत्र बसून ते सोडवू,” असे आवाहन आव्हाड यांनी केले आहे. मात्र, चव्हाण यांच्या विधानावरून ठाण्यात काँग्रेस आता माघार घेण्याच्या मनस्थितीत नसल्याचे स्पष्ट दिसत आहे.

ताज्या बातम्या

मराठी

Pratap Sarnaik: १ मे पासून मराठी सक्तीची मोहीम आम्ही चालू ठेवणार,...

0
मुंबई | Mumbaiराज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेची सक्ती करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबत आज मंत्रालयात महत्त्वाची बैठक पार पडली. मराठी भाषा सक्ती १...