नाशिक | प्रतिनिधी Nashik
शहरातील पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर मागील अनेक महासभांमध्ये नगरसेवकांकडून सातत्याने तक्रारी होत असतानाही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा होत नसल्याने बुधवारी झालेल्या महासभेत तब्बल चार तास पाणीप्रश्नावर चर्चा झाली. यावेळी महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी अधिकाऱ्यांना चांगलीच तंबी देत, “अधिकाऱ्यांना क्षेत्रावर जाऊन काम करता येत नसेल तर त्यांना घरी पाठवा,” असे स्पष्ट निर्देश दिले. स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे यांनाही त्यांनी कामात सुधारणा करण्याची सक्त ताकीद दिली.
नवीन नाशिक विभागातील पाणीप्रश्नावर सत्ताधारी भाजपच्या चार नगरसेवकांनी सकाळी आंदोलन केले होते. त्यानंतर महासभेतही पाणीपुरवठ्याचा मुद्दा गाजला. महापौरांनी आयुक्तांनी याबाबत स्पष्ट भूमिका मांडावी, असे निर्देश दिल्यानंतर खत्री यांनी पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता रविंद्र धारकर आणि स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे यांना कामकाजाबाबत जाब विचारला.
पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी केवळ वॉलमनवर जबाबदारी ढकलून चालणार नाही, असे खत्री यांनी स्पष्ट केले. वॉलमन काम करत नसेल तर संबंधित कनिष्ठ अभियंत्यांनी क्षेत्रावर जाऊन पाहणी करणे आवश्यक आहे. अधिकारी आणि अभियंते प्रत्यक्ष क्षेत्रावर जात नसतील अथवा कामात हलगर्जीपणा करत असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
“प्रत्येक वेळी वॉलमनचा मुद्दा पुढे येतो. वॉलमन काम करत नसेल तर कनिष्ठ अभियंता आणि संबंधित अधिकाऱ्यांनी क्षेत्रावर जाऊन काम पाहिले पाहिजे. तेही काम करत नसतील तर त्यांना घरी पाठवा,” अशी सक्त ताकीद खत्री यांनी दिली.
नगरसेवकांशी समन्वय साधण्याचे निर्देश
सुमंत मोरे यांनी आपल्या अधिकारी व अभियंत्यांना पाणीपुरवठ्याबाबत स्पष्ट सूचना द्याव्यात आणि महापालिकेतील नगरसेवकांशी समन्वय साधून काम करावे, असेही आयुक्तांनी सांगितले. शहरातील ज्येष्ठ नगरसेवकांकडून पाणीपुरवठ्याबाबत मार्गदर्शन घ्यावे, कारण “आपल्यापेक्षा ते या शहराच्या प्रश्नांमध्ये अधिक अनुभवी आहेत,” असेही त्यांनी नमूद केले.
महापालिकेत नव्याने अभियंत्यांची भरती झाली असून त्यापैकी १४ अभियंते पाणीपुरवठा विभागाला, तर १४ अभियंते बांधकाम विभागाला देण्यात आले आहेत. आणखी १० ते १२ कनिष्ठ अभियंते पाणीपुरवठा विभागाला देण्यात येणार आहेत. एवढे मनुष्यबळ उपलब्ध करूनही पाणीप्रश्न सुटत नसेल तर त्याची कारणे शोधून जबाबदारी निश्चित करा, असा संताप आयुक्तांनी व्यक्त केला.
नवीन अभियंत्यांना तातडीने प्रशिक्षण देऊन त्यांना नगरसेवकांशी समन्वय साधत क्षेत्रावर काम करण्याच्या सूचना द्याव्यात, असे आदेश खत्री यांनी धारकर आणि मोरे यांना दिले.
सोमवारी संयुक्त बैठक
स्मार्ट सिटी आणि महापालिकेने पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर संयुक्तपणे काम करावे, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. यासाठी सोमवारी दोन्ही विभागांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
स्मार्ट सिटीने शहरातील जलकुंभांवर बसविलेल्या प्रवाहमापकांच्या नोंदींचाही मुद्दा यावेळी उपस्थित झाला. सुमंत मोरे यांनी शहरातील ११० पैकी सुमारे ९५ जलकुंभांवर प्रवाहमापक बसविल्याची माहिती दिली. त्यावर आयुक्तांनी पुढील १५ दिवसांत या ९५ जलकुंभांची नोंद उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. या नोंदींच्या आधारे पाणी नेमके कुठे कमी होत आहे किंवा गळती कुठे आहे, याचा शोध घेण्यात येणार आहे.
नवीन जलकुंभांसाठी आठवड्याची मुदत
नवीन जलकुंभांच्या कामांबाबतही आयुक्तांनी पाणीपुरवठा विभागाला आठवड्याची मुदत दिली. गंगापूर धरणातून शहराकडे येणाऱ्या जुन्या जलवाहिन्यांमधून मोठ्या प्रमाणात पाणीगळती होत असल्याचा मुद्दाही चर्चेत आला. सुमारे ३० टक्के पाणीगळती होत असल्याने संबंधित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश खत्री यांनी दिले.
बाराबंगला जलशुद्धीकरण केंद्रावरही नाराजी
दरम्यान, बाराबंगला जलशुद्धीकरण केंद्राच्या नूतनीकरणाचे काम संथ गतीने सुरू असल्याबद्दलही आयुक्तांनी सुमंत मोरे यांना सुनावले. “कामाची गती वाढवून ऑक्टोबरपर्यंत काम पूर्ण करा. गरज पडल्यास बाराबंगला येथे खुर्ची टाकून बसा आणि काम पूर्ण करून घ्या. काम होत नसेल तर तुम्हाला घरी पाठवावे लागेल,” अशा शब्दांत खत्री यांनी मोरे यांना तंबी दिली.




