Thursday, March 13, 2025
Homeब्लॉगकलासाधकाची शतकाकडे वाटचाल !

कलासाधकाची शतकाकडे वाटचाल !

चित्रकार पंडित विष्णू सोनवणी यांचा जन्म १३ फेब्रुवारी १९३१ रोजी नाशिक जिल्ह्यातल्या निफाड येथे झाला. वयाच्या ९५ व्या वर्षात ते पदार्पण करीत आहेत. आजही त्यांचा दिवस चित्र रेखाटून सुरू होतो. इंदिरानगर येथील सर्वात्मक वाचनालय व कलादालनात दि. १२ व १३ रोजी त्यांचा सत्कार व चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. त्या निमित्ताने शतकाकडे वाटचाल करणाऱ्या कलासाधनेला सलाम !

माध्यमिक शिक्षणाच्या शेवटच्या टप्प्यावर नाशिक शहरात आले. न्यू हायस्कूलमध्ये कलाशिक्षक व नंतर कलानिकेतन या संस्थेच्या ड्रॉइंग टीचर्स विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी काम केले. काही काळ औरंगाबादच्या शासकीय कला महाविद्यालयात ते प्राध्यापक होते.

- Advertisement -
#image_title

पंडितरावांना जवळचे सगळे अण्णा या टोपणनावाने ओळखतात. १९६० पासून वृत्तपत्रे व विविध नियतकालिकांतून कथाचित्रकार (इलस्ट्रेटर) म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली. नाशिकमधील ‘अमृत’, ‘गांवकरी’, ‘श्रीयुत’, ‘रसरंग’, ‘देशदूत’, ‘लोकमत’, ‘सकाळ’ या वृत्तपत्रे, साप्ताहिकांसाठी कथाचित्रे (इलस्ट्रेशन्स), संकल्पना (डिझाइन) व मांडणी (लेआउट) यात त्यांनी स्वत:चा वेगळा ठसा उमटवला, तसेच मुंबईतील ‘शब्दरंजन’, ‘बहुश्रुत’, ‘लोकसत्ता’, ‘चित्रानंद’ या प्रकाशनांसाठीही त्यांनी काम केले. याखेरीज महाराष्ट्र पाठ्यपुस्तक मंडळाच्या मराठी, कन्नडमधील बालभारतीच्या पुस्तकांचे, तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ , पुणे, मुंबई, कोल्हापूरमधील अनेक ख्यातनाम प्रकाशनांसाठी त्यांनी काम केले. अतिशय उत्तम सुलेखन (कॅलिग्राफी) हा सोनवणींचा खास प्रांत होय. त्यांनी त्यात इतके विविध प्रयोग केले; पण त्यांच्या संकोची स्वभावामुळे त्यांना फारशी प्रसिद्धी मिळाली नाही. याची खंत त्यांच्यापेक्षा सुहृदांनाच जास्त आहे.

मुखपृष्ठापासून अंतर्बाह्य सजावटीने अण्णांनी वाचकांची अभिरुची समृद्ध केली. प्रत्येक डमी अंक तयार करून त्यानुसार पृष्ठमांडणी करण्याची पद्धत विकसित केली. ती पुढे प्रकाशनक्षेत्रात सर्वत्र रुढ झाली.

#image_title

पेन व ब्रशने केलेल्या चित्रांचा आणि इलस्ट्रेशन्सचा फार मोठा संग्रह त्यांच्याजवळ आहे. पन्नास वर्षांतील या सर्व निवडक चित्रांचे प्रदर्शन २००१ मध्ये नाशिक, सांगली व मुंबई येथील सर जे.जे. स्कूल ऑफ अप्लाइड आर्टमध्ये झाले. दिल्लीच्या ऑल इंडिया फाइन आर्ट सोसायटीच्या कलादालनात २००५ मध्ये त्यांचे प्रदर्शन झाले. दैनिक गांवकरीमध्ये त्यांनी निर्माण केलेल्या वाटेवरून मला वाटचाल करता आली. ते लोकहितवादी मंडळ चित्रकला समिती अध्यक्ष असतांना मला कार्यवाह म्हणून अनेक वर्षे काम करण्याची संधी मिळाली. नाशिकमधील असंख्य तरुण चित्रकारांचे ते मार्गदर्शक आहेत. त्यांना ‘ऑल इंडिया फाइन आर्ट्स अ‍ॅण्ड क्राफ्ट सोसायटी, नवी दिल्ली’तर्फे ‘तपस्वी चित्रकार’ (व्हेटर्न आर्टिस्ट) हा सन्मान व इतरही पुरस्कार मिळाले आहेत. नाशिकसारख्या ठिकाणी कथाचित्रे आणि मांडणी या स्वरूपाचे काम करून त्यांनी दृकसंवाद कलेची एक परंपरा रुजवली.
नि:शब्दाला रंगरुप देणाऱ्या अण्णांची शताब्दी साजरी करण्याची संधी आपल्याला मिळो ही सरस्वतीचरणी प्रार्थना.

संजय देवधर
(वरिष्ठ पत्रकार, कलासमीक्षक)
९४२२२७२७५५

कौशल्य अन् अखंड प्रयोगशीलता !
उपलब्ध सामग्रीचा कुशलतेने वापर करून आकर्षकता आणण्याचे अण्णांचे प्रयोग यशस्वी झाले. त्यांचे अनुकरण अनेकांनी केले. फाईन आर्टस् विभागात शिक्षण घेऊनही त्यांनी अखंडपणे जाहिराती, प्रकाशने यांचेच काम करुन आपली नाममुद्रा उमटवली. रेखाटने, अक्षरलेखन, मुखपृष्ठे, कथाचित्रे याबरोबरच विविध समारंभातील मानपत्रे, व्यासपीठ सजावट करण्याचे त्यांचे कौशल्य कायमच कौतुकास्पद ठरले. आपल्या मिश्किल स्वभावाने अनेकांशी मैत्रीचे संबंध जोडले. कलासंग्रहाप्रमाणे मोठा त्यांनी लोकसंग्रह केला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...