नाशिक । प्रतिनिधी Nashik
राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या संकल्पनेतून येत्या शुक्रवारी (दि.7) प्रकल्प कार्यालय ते मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी शासकीय आश्रमशाळेत एक दिवस मुक्काम करणार आहे. मंत्री डॉ. उईके हे देखील आश्रमशाळेत भेट देऊन विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार आहेत. या भेटीत विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेण्यासोबतच आश्रमशाळेतील मूलभूत सुविधांची पाहणी केली जाणार आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा
आदिवासी विकास विभागाच्या राज्यात 497 शासकीय आश्रमशाळा असून, त्याठिकाणी अनुसूचित जमातीचे सुमारे दोन लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. या सर्व आश्रमशाळांमध्ये मंत्रालय, आदिवासी विकास आयुक्तालय, आदिवासी विकास महामंडळ, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, अपर आयुक्त व प्रकल्प कार्यालयातील अधिकारी एक दिवस मुक्कामी राहणार आहेत. वरिष्ठ स्तरावरून अधिकार्यांच्या भेटीचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. त्यानुसार राज्यातील सर्व अधिकारी त्यांच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक शासकीय आश्रमशाळेत पूर्णवेळ उपस्थित राहून सर्व सोयी सुविधांची तपासणी करणार आहेत.
दरम्यान, मुक्कामी असलेले अधिकारी विद्यार्थ्यांशी हितगुज साधून तसेच तपासणी करुन अहवाल वरिष्ठांना सादर करणार आहेत. अहवालाचे अवलोकन केल्यानंतर शाळानिहाय कृती कार्यक्रम तयार करुन अभिप्रायासह सर्व प्रकल्प अधिकार्यांना आयुक्त कार्यालयास सादर करावा लागणार आहे. या उपक्रमामुळे राज्यातील शासकीय आश्रमशाळांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे.
आदिवासी विकास विभागाच्या राज्यातील प्रत्येक शासकीय आश्रमशाळेत 7 फेब्रुवारीला अधिकारी भेट देऊन रात्री मुक्काम करणार आहे. विद्यार्थ्यांसोबत हितगुज साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या जाणार आहे. उपलब्ध मूलभूत सुविधांची पाहणी करण्यात येईल.
-नयना गुंडे, आयुक्त, आदिवासी विकास विभाग