Sunday, August 23, 2026
Homeब्रेकिंग न्यूजराज-का-रण : कागदावरील स्मार्ट सादरीकरण अन् रस्त्यावर २५ फुट खड्डा!

राज-का-रण : कागदावरील स्मार्ट सादरीकरण अन् रस्त्यावर २५ फुट खड्डा!

नाशिक | शैलेंद्र तनपुरे – दै. ‘देशदूत’ – संपादक

- Advertisement -

सिंहस्थाच्या ध्वजारोहणासाठी आता अवघे दोन महिने उरलेले असताना कुंभमेळा आयुक्तांनी, काळजी नको, सगळं काही ठीक होईल, अशी दिलेली ग्वाही सत्यात उतरो, एवढीच प्रार्थना आपण करू शकतो. यापुढे नाशिककरांनाही या विकास प्रक्रियेत विश्वासात घेण्याबाबत त्यांना सुबुद्धी सुचली आहे, हे नाशिककरांचे भाग्य. शहरातील भयाण स्थितीमुळे नाशिककरांची सिंहस्थाविषयीच होत चाललेली नकारात्मक भावना दूर व्हावी, यासाठी आता हस्तीदंती मनोर्‍यात बसून नव्हे तर प्रत्यक्षात युद्धभूमीवर उतरण्याची गरज वाटायला लागली हे महत्त्वाचे.

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीने सध्या चांगलाच वेग घेतला आहे. सिंहस्थाचे नामकरण आता महासिंहस्थ असे झाले, यावरूनही या वेगाची कल्पना यावी. प्रशासकीय पातळीवर हीच तयारी मात्र कमालीच्या तणावात सुरू आहे. कारण एकीकडे शहर परिसराची झालेली उद्ध्वस्त धर्मशाळा, सामान्य नाशिककरांसह उद्योजकांचा वाढलेला पारा, लोकक्षोभाला तोंड देताना लोकप्रतिनिधींचीही होत असलेली तगमग आणि या सर्वांच्या दबावामुळे सरकारमधूनही दिले जाणारे रट्टे अशा अवघडल्या परिस्थितीत प्रशासनाची चांगली, दर्जेदार कामे आणि तीदेखील वेळेत करण्यासाठी होत असलेली कुतरओढ याचा ताण अधिकार्‍यांवर किती व कसा आला आहे, याची प्रचिती नुकतीच आली.

कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी शहरातील मुद्रित व इलेट्रॉनिस माध्यमांच्या संपादक व प्रतिनिधींशी नुकताच संवाद साधला. प्रशासनाने सिंहस्थासाठी चालविलेल्या तयारीचे सादरीकरण शेखर सिंह यांनी या माध्यम प्रतिनिधींसमोर केले तेव्हा या तणावाची प्रकर्षाने जाणीव झाली. शेखर सिंह यांनी सिंहस्थाच्या तयारीचे एक विस्तृत सादरीकरण (झीशीशपींरींळेप) केले. हे सादरीकरण पाहताना प्रशासनाची किमान कागदावरील तयारी खरोखरच अचंबित करणारी आणि अतिशय आकर्षक वाटली. अतिशय काळजीपूर्वक तयार केलेले हे प्रेझेंटेशन, त्याला एआयच्या मदतीने दिलेली प्रभा आणि सादरीकरण करताना दस्तुरखुद्द शेखर सिंह यांची अत्यंत आश्वासक, ठाम व आत्मविश्वासाने परिपूर्ण अशी देहबोली यामुळे जवळपास दीड तास त्यांनी सर्वांनाच मंत्रमुग्ध केले. हे सारे करीत असतानाच त्यांनी नाशिकच्या माध्यमांनी नकारात्मक चित्रण करू नये, अशी विनंतीवजा मखलाशी केली.

साहजिकच नंतर मग या ‘पॉवरपॉईंट’च्या चकचकित पडद्यामागे लपलेले नाशिकचे वास्तवातील चित्र किती विदारक, जीवघेणे आणि संतापजनक आहे, याचा पाढा वाचायला जेव्हा माध्यम प्रतिनिधींनी सुरुवात केली तेव्हा प्रशासनाच्या वतीने सिंह यांनी दिलगिरी व्यक्त केली. कामांना झालेला उशीर, त्याचा सामान्यांना होत असलेला प्रचंड त्रास याची जाणीव आपणास आहे, याची कबुली देतानाच आणखी काही दिवस हे सहन करण्याविना पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, त्याचवेळेस गंगापूर रस्त्यावर विकासकामांसाठी खडी नेणारा डंपर वीस फूट खड्ड्यात अचानक कसा भूमिगत झाला याची चित्रफीतच समोर आली आणि तेव्हा मात्र सगळ्यांचीच बोलती बंद झाली. नेमके काय झाले याची तोपर्यंत प्रशासनातीलही कोणाला कल्पना नसल्याने या घटनेवर कसे व्यक्त व्हावे हेदेखील त्यांना कळत नव्हते.

आयुक्तांचा दांडगा आत्मविश्वास
आयुक्त शेखर सिंह यांनी केलेले सादरीकरण अतिशय उत्तम आणि व्यावसायिक दर्जाचे होते. यात प्रशासनाने सर्वच क्षेत्रांचा किती काटेकोर आणि सूक्ष्म अभ्यास केला आहे, हे दाखवून देण्याचा प्रयत्न झाला. सिंह यांचा आत्मविश्वास इतका दांडगा होता की, त्यांनी मांडलेली प्रत्येक योजना ऐकताना नाशिक खरोखरच एका जागतिक दर्जाच्या आणि आधुनिक शहरात रूपांतरित होत असल्याचा भास झाला. सुरू असलेली कामे केवळ आगामी सिंहस्थाचा विचार करून केली जात नसून, ती पुढील पन्नास वर्षांच्या गरजा लक्षात घेऊन केली जात आहेत हे सांगताना त्यांनी या शाश्वत विकासाच्या प्रत्येक कामाचे सखोल विवेचनही केले. रस्ते, पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन आणि वाहतूक या सर्वच आघाड्यांवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अतिशय शाश्वत (र्डीीींरळपरलश्रश) अशा पायाभूत सुविधा उभारल्या जातील. नाशिकमध्ये इतर कोणत्याही शहरांपेक्षा अधिक चांगले वातावरण, ऊर्जा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. बाह्य रिंगरोडच्या विषयाचेही त्यांनी सविस्तर स्पष्टीकरण दिले. एवढेच नव्हे तर ही सगळी कामे पूर्णत्वास गेल्यानंतर नाशिक नगरी ही केवळ राज्याचीच नव्हे तर देशाची आध्यात्मिक राजधानी म्हणून उदयास येईल, अशी भविष्यवाणीही केली.

वास्तवाची चपराक
एकीकडे वातानुकूलित दालनात नाशिकच्या दीर्घकालीन उज्ज्वल भविष्याचे सादरीकरण सुरू होते, तर दुसरीकडे प्रशासनाच्या या दाव्यांच्या ठिकर्‍या उडवणारी एक भयंकर घटना शहराच्या मध्यवस्तीत घडत होती. शहरातील सर्वाधिक वर्दळीचा आणि उच्चभ्रू समजल्या जाणार्‍या गंगापूररोड परिसरात, रहदारीच्या मुख्य रस्त्यावर अचानक तब्बल २५ फूट खोल खड्डा पडला आणि खडीने पूर्ण भरलेला एक भलामोठा ‘हायवा’ ट्रक म्हणजेच डंपर त्या खड्ड्यात, म्हणजेच थेट भूगर्भात जाऊन विसावला! ही केवळ एक दुर्घटना नव्हती, तर ती प्रशासनाच्या कारभारावर, निकृष्ट दर्जाच्या कामांवर आणि तथाकथित ‘शाश्वत विकासा’च्या दाव्यांवर बसलेली एक सणसणीत चपराक होती. हा निव्वळ अपघात होता, हे मान्य पण त्यातून पालिकेच्या रस्त्यांच्या दाव्यांची पोलखोल तर झालीच; शिवाय नाशिककरांची सध्याच्या व्यवस्थेविषयीची नाराजी किती रास्त आहे याचीही प्रचिती आली.
.
जेव्हा हा अपघात झाला ती वेळ शाळा सुटण्याची असते आणि त्यावेळी अनेक शाळांच्या बसेस मुलांना घेऊन तेथून जात असतात. समजा डंपरऐवजी तेव्हा एखादी शाळा बस असती तर काय घडले असते याचा विचारही करवत नाही. ज्या शहरात मुख्य रस्त्यावर चालता-चालता रस्ता खचून अख्खा ट्रक गिळंकृत केला जातो, त्या शहरात ५० वर्षांच्या शाश्वत विकासाच्या गप्पा मारणे हा नाशिककरांच्या जीवाशी खेळलेला एक क्रूर विनोद नव्हे तर काय? कागदावर काटेकोर अभ्यास केल्याचा दावा करणार्‍या प्रशासनाला, रस्त्याखालून जाणारी जलवाहिनी किंवा ड्रेनेज लाईन गळती होऊन रस्ता आतून पोखरला जात आहे याचा साधा अंदाजही येऊ नये, हे प्रशासकीय अपयशाचे सर्वोच्च उदाहरण आहे. गंगापूररोडवरील घटना हा हिमनगाचा केवळ एक भाग आहे. प्रशासनाच्या या नियोजनशून्य कारभाराची उदाहरणे संपूर्ण शहरभर विखुरलेली आहेत.

समृद्धी महामार्ग तसेच स्मार्ट सिटी या विद्यमान शासनाच्या सर्वार्थाने महत्त्वाकांक्षी योजना. पैकी समृद्धी महामार्गाची उपयुक्तता सिद्ध झालेली असली तरी त्यावरील वाढते भीषण अपघात ही डोकेदुखी ठरली आहे. याशिवाय या महामार्गाचे सादरीकरण करताना मार्गाच्या ठराविक अंतरावर असणार्‍या नोडस्वर नऊ नवनगरे वसविली जातील व त्यामुळे संबंधित परिसराचा कसा कायापालट होऊ शकेल, याचे स्वप्न तेव्हा दाखविले गेले. पैकी नवनगरांचा विचार आता सरकारनेच सोडून दिल्याने परिसराचा कायापालट आपसूकच गळाला. शिवाय अद्यापही महामार्गावर अनेक सुविधांची वानवा आहेच. त्याच्याविषयी अनेकदा लिहून आले आहे. अंमलबजावणी शून्य. केंद्र शासनाने बारा वर्षांपूर्वी आणलेल्या शंभर स्मार्ट सिटी योजनेकडे पाहावे लागेल. शहरे स्मार्ट होता होता राहिली आणि अखेर सरकारलाच पश्चातबुद्धी होऊन लक्षावधी कोटींचा चुराडा करून ही योजना अखेर थंड्या बस्त्यात टाकून द्यावी लागली.

या अपयशी योजनेचा मोठा फटका नाशिकला बसला म्हणून त्याचा उल्लेख अपरिहार्य ठरतो. महासिंहस्थाचे महासादरीकरण सुरू असताना जी भव्यदिव्य स्वप्नं दाखविली जात होती, ती पाहूनच या योजनेचाही उहापोह होणे स्वाभाविक होते. माध्यम प्रतिनिधींनी त्याबद्दल हा सूर्य हा जयद्रथ थाटाने बर्‍याच गोष्टींचा उल्लेख केला. स्मार्ट सिटीच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्चून केलेल्या कामांची आजची हालत काय हे आवर्जून सांगितले गेले. अनेक रस्त्यांचे काँक्रिटीकरण आणि डांबरीकरण यात ताळमेळ नसल्याने अपघातांना निमंत्रण मिळत असल्याचे सांगितले गेले. द्वारका येथील भुयारी मार्गाचे नियोजन काटेकोर नसल्याने दररोज हजारो वाहने ट्रॅफिकमध्ये अडकून पडतात. सिंहस्थात जेव्हा लाखो भाविक येतील, तेव्हा या कोंडीचे काय होईल, याचे कोणतेही ठोस उत्तर प्रशासनाकडे नाही. जलवाहिनी, गॅस पाईपलाईन अशा सहा ते सात युटिलिटींसाठी रस्ते खोदले गेले, आजही हे काम चालू आहेच; पण ते महिनोन्महिने पूर्ववत न केल्याने संपूर्ण शहराची अवस्था उद्ध्वस्त धर्मशाळेसारखी झाली आहे.

या कामांचे कोणतेच डिटेल्स साईटवर नसल्याने कोणत्या यंत्रणांना याविषयी विचारावे यासारखे असंख्य प्रश्न असल्याची चर्चाही झाली. या गोंधळाचा फटका केवळ सामान्य नाशिककरांनाच बसतोय असे नाही, तर आगामी सिंहस्थाचे मुख्य मानकरी असलेले साधू, संत आणि आखाड्यांचे महंतही या कारभारावर नाराज आहेत. कुंभमेळ्यासाठी देशभरातून लाखो साधू-संत नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होतात. त्यांच्या निवासासाठी साधुग्रामची उभारणी, गोदावरीच्या घाटांची दुरुस्ती, शाही मार्गांचे रुंदीकरण आणि स्वच्छ पाणीपुरवठा या मूलभूत गरजा आहेत. मात्र, प्रत्यक्ष जमिनीवरील गती पाहून महंतांनीही उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. ५० वर्षांच्या नियोजनाच्या गप्पा मारल्या जातात, मात्र आजही रामकुंडासह गोदावरी नदीत थेट सांडपाणी सोडले जात आहे. प्रदूषित पाण्यात साधूंनी शाहीस्नान कसे करायचे? हा महंतांचा संतप्त सवाल आहे.

सिंहस्थाचे नियोजन करताना आखाडा परिषद आणि स्थानिक महंतांना विश्वासात घेतले जात नाही, असाही त्यांचा स्पष्ट आरोप आहे. मात्र, आयुक्तांप्रमाणेच कुंभमेळामंत्र्यांनाही साधू-महंतांचे समाधान करण्याची खात्री वाटत असल्याने या विषयावर ते तुलनेत स्वस्थ आहेत. सिंहस्थाच्या ध्वजारोहणासाठी आता अवघे दोन महिने उरलेले असताना कुंभमेळा आयुक्तांनी दिलेली ही ग्वाही सत्यात उतरो, एवढीच प्रार्थना आपण करू शकतो. दस्तुरखुद्द आयुक्त एकूणच तयारी व अंमलबजावणीच्या तारखांबाबत कमालीचे आश्वस्त आहेत. त्यांनी ते वारंवार सांगितले. त्यांच्या या आत्मविश्वासाला सलाम. सूत्रे हाती घेतल्यानंतर सिंह एकदाच माध्यमांना भेटले. नंतर त्यांना तशी गरज वाटली नाही.

आता मात्र ही समन्वयाची दरी सांधण्याचा त्यांचा प्रयत्न जाणवला. झाली तेवढी उपेक्षा पुरे, असेही कदाचित त्यांना वाटले असावे. यापुढे नियमित पत्रकार परिषदा घेण्याबरोबरच ज्या नाशिकमध्ये हा महासोहळा होत आहे, त्या नाशिककरांनाही या विकास प्रक्रियेत विश्वासात घेण्याबाबतही आता त्यांना सुबुद्धी सुचली आहे, हे नाशिककरांचे भाग्य. शहरातील भयाण स्थितीमुळे नाशिककरांची सिंहस्थाविषयीच होत चाललेली नकारात्मक भावना दूर व्हावी, यासाठी आता हस्तीदंती मनोर्‍यात बसून नव्हे तर प्रत्यक्षात युद्धभूमीवर उतरण्याची गरज वाटायला लागली हे महत्त्वाचे.
मो. ९३२५३८३०९२

ताज्या बातम्या

Ahilyanagar : राहुल गांधी यांच्याकडून राजकीय पोळी भाजण्याचे काम सुरू

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar कॉक्रोज जनता पक्षाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर छात्रो की गुंज असे उपक्रम हाती घेऊन राहुल गांधी स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याचे काम करत आहेत....