Wednesday, February 19, 2025
Homeनाशिकनाट्यगृहे कथा अन् व्यथा : पं. पलुस्कर सांस्कृतिक भवन धूळखात

नाट्यगृहे कथा अन् व्यथा : पं. पलुस्कर सांस्कृतिक भवन धूळखात

पंचवटी | मनोज निकम | Panchvati

पंचवटीतील (Panchvati) पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर सांस्कृतिक भवनाचे तब्बल सव्वाचार कोटी रुपये खर्च करून नूतनीकरण करण्यात आले. स्मार्ट सिटीने या नूतनीकरणाचे काम करून हे भवन महापालिकेकडे वर्ग केल्याचा दावा केलेला आहे. मात्र त्याचे उद्घाटन करण्याचा मुहूर्त महापालिकेला (NMC) अजूनही सापडत नसल्याने हे भवन समस्येच्या गर्तेत सापडले आहे. या भवनाचे वीजबिल थकित झाल्याने ते अंधारात आहे. त्याच्या पायऱ्यांवर गवत वाढले आहे. वापरात नसल्याने परिसर अस्वच्छ असून भवन धूळखात पडले आहे.

- Advertisement -

नाशिक महापालिकेने (Nashik NMC) इंद्रकुंडाच्या पश्चिमेला १९९८ मध्ये हे भवन उभारले. त्याच्या नूतनीकरणाचे काम २०१९ ला सुरू करण्यात आले. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. मात्र नूतनीकरणानंतर हे भवन धूळ खात पडले असल्याने त्याची दुरवस्था होऊ लागली आहे. पूर्वी पंचवटीत उभारण्यात आलेल्या या छोट्या भवनात अनेक कार्यक्रम होत असत. मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे येथे कार्यक्रमाची रेलचेल असली तरी या भवनाच्या अनेक तांत्रिक बाबींचा अभाव असल्याने कार्यक्रम करण्यासाठी आयोजकांना अडचणी निर्माण होत होत्या. त्या दूर करण्यासाठी तसेच भवनाला चांगले स्वरूप देण्याच्या दृष्टीने २०१९ पासून या भवनाच्या नूतनीकरणास सुरुवात झाली.

या भवनाचे काम पूर्ण झाल्याचे स्मार्ट सिटीकडून (Smart City) सांगण्यात आले आहे. प्रवेशद्वारावर भवनाचा मोठा फलक झळकला आहे. भवनात नव्याने करण्यात आलेल्या बदलात पूर्वी असलेली १९० खुर्वांची आसन व्यवस्था कमी करून १६० करण्यात आली आहे. रंगमंचाची रुंदी एक मीटरने वाढवण्यात आली आहे. संपूर्ण भवन वातानुकूलीत करण्यात आले आहे. प्रकाश योजना, ध्वनी व्यवस्था, मेकअप रूम आदींच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. व्हीआयपी रूमचेही नूतनीकरण करण्यात आले आहे.

दरम्यान, ३०० किलोवॅट अॅम्पिअरचे ट्रान्सफॉर्मर आणि २०० किलोवॅटच्या डिझेल जनरेटरचीही व्यवस्था केली आहे. अशा सुमारे सव्वाचार कोटींच्या सुविधा देऊन नूतनीकरण करण्यात आलेले आहे. या तांत्रिक बाबींच्या यंत्रणेचा वापर होणे गरजेचे आहे. त्या जर बंद अवस्थेत राहिल्या तर त्यांच्या दुरुस्तीच्या खर्चाची भर पडू शकते, अशी स्थिती आहे. केवळ खर्च करून नूतनीकरण करण्याचा देखावा करण्यापेक्षा ती वास्तू वापरता असणे गरजेचे आहे, असे असताना त्याकडे दुर्लक्ष होत आहे तसेच येत्या कुंभमेळ्यापर्यंत भवन चालू होईल का? असा प्रश्न निर्माण झाला आहे म्हणून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या