अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील शेंडी (ता. अहिल्यानगर) शिवारातील जिप मोटर्स शोरूम फोडून झालेल्या चोरीचा गुन्हा केवळ काही दिवसांत उकलण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे. या गुन्ह्यातील तिघे सराईत चोरटे पोलिसांनी पकडले असून त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेला लॅपटॉप, दोन मोबाईल तसेच घरफोडी करण्यासाठी वापरलेले साहित्य हस्तगत करण्यात आले आहेत.
शेंडी शिवारात अभिमन्यू इंद्रजित नय्यर यांचे जिप मोटर्स शोरूम आहे. त्या ठिकाणी अफ्रिदी रशिद सय्यद (रा. फकीरवाडा, डी.एस.पी. चौक, अहिल्यानगर) हे जनरल मॅनेजर असून, त्यांनी 3 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता शोरूम बंद केले होते. दुसर्या दिवशी 4 सप्टेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता शोरूम उघडल्यावर काचेच्या दरवाज्याचे कुलूप तोडून चोरी झाल्याचे निदर्शनास आले. चोरट्यांनी लॅपटॉप, मोबाईल व रोकड चोरून नेली होती. सय्यद यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा तपास सुरू असताना सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना माहिती मिळाली की चोरी करणारे तिघे संशयित पोखर्डी (ता. अहिल्यानगर) शिवारात आहेत. पोलिसांनी पथकासह तेथे धाड टाकून संशयितांना पाठलाग करून पकडले. चौकशीत त्यांनी आपली नावे हृतिक दार्या चव्हाण (रा. काळामाथा, गजराजनगर, अहिल्यानगर), सुंदर नितीन काळे व संजय ऊर्फ चोच दार्या चव्हाण (दोघे रा. डायमंड स्टाईलमागे, काळामाथा, गजराजनगर, अहिल्यानगर) अशी सांगितली.
पुढील चौकशीत तिघांनी मिळून चोरी केल्याची कबुली दिली. हे तिन्ही संशयित आरोपी सराईत असून त्यांच्या विरोधात पूर्वीही एमआयडीसी व कोतवाली पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई सहायक निरीक्षक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार राकेश खेडकर, राजु सुद्रीक, संदीप पवार, सचिन आडबल, किशोर जाधव, नवनाथ दहिफळे, ज्ञानेश्वर आघाव, दीपक फुंदे, राहुल गुंड्डू यांच्या पथकाने केली.




