नाशिक | प्रतिनिधी
नाशिक महापालिकेच्या हद्दीत काल (दि. ०८) रोजी प्राप्त अहवालात करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर कोणार्कनगर २ येथे वास्तव्यास असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा करोनाने मृत्यू झाल्याची घटना आज घडली. यानंतर महापालिकेकडून या पोलीस कर्मचाऱ्याच्या निवासस्थानासह, कोणार्कनगर, तारवाला नगर, इंदिरानगर व धात्रक फाटा परिसर सील करण्यात आला आहे. लवकरच या परिसरातील संशयित रुग्णांची तपासणी आरोग्य विभागाकडून करण्यात येणार आहे.
आज महापालिकेकडून एकूण ३ ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र निर्माण करण्यात आले आहेत. यामध्ये तारवाला नगर, इंदिरानगर व धात्रक फाटा यांचा समवेश आहे. तर आज कोणार्कनगर येथील एका पोलीस कर्मचाऱ्याचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. या पोलीस कर्मचाऱ्याच्या घरातील सदस्यांना स्थानबद्ध करण्यात आले आहे
तसेच कोणार्क नगर येथील या पोलीस कर्मचाऱ्याचे राहते घर आणि परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. याठिकाणी अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त सर्व सेवा बंद करण्यात आल्या आहेत. आरोग्य विभागाकडून लवकरच प्रतिबंधित क्षेत्रात तपासणीचे काम हाती घेतले जाणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.




