पळाशी | प्रतिनिधी
नांदगाव तालुक्यातील पळाशी येथे एकाच रात्रीत तीन घरफोड्या करून चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरणात पसरले आहे.
पळाशी ता. नांदगांव येथील रहिवाशी विलास शिवाजी आव्हाड यांचे राहते घरात दोघे पती – पत्नी झोपलेले असताना घरातील एका कुलूप बंद खोलीच कुलूप तोडून कपाटाचेही कुलूप तोडले व कपाटातील लॉकर मध्ये ठेवलेली सोन्याची दोन मंगळ सूत्रे पोत, नेकलेस दागिने, तीन अंगठ्या असा तीन चार तोळ्याची दागिने चोरट्यांनी चोरून नेले. यात सुमारे चार ते पाच लाखांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला.
दुसऱ्या घटनेत विलास आव्हाड यांच्या घरापासून जवळच अंतरावर असलेले त्यांचे चुलत भाऊ संजय आनंदा आव्हाड यांच्याकडे चोरट्यांनी मोर्चा वळविला. त्यांच्या घरातील समान अस्ताव्यस्त केले. त्यांच्या वडिलांनी सांभाळून ठेवलेले चांदीचे चार ठोकळे चोरट्यांनी लंपास केले.
तर तिसऱ्या घटनेत राजेंद्र दौलत शेवाळे याचे घराचे कुलुप तोडून शेवाळे यांच्या घरातील आलेल्या पाहुण्यांनी आणलेली केळी व पेढे यांच्यावर चोरट्यांनी ताव मारला.त्यांनी येथून तीन चार हजार रुपयांची रोकड चोरली.
चोरीच्या घटनेची खबर पळाशीचे पोलिस पाटील समाधान शिंदे यांनी नांदगाव पोलिसांना दिली. नांदगांव पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिगंबर भदाणे ,उपनिरीक्षक सुनील बडे , पोलीस सानप, बरहतकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. व चौकशी केली.नाशिक येथून डॉग पथकाचे सहाय्यक उपनिरीक्षक महाले फॉरेन्सिक लॅबचे सहाय्यक उपनिरीक्षक गांगुर्डे, कांबळे यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले .अधिक तपास पोलीस करीत आहे.




