Sunday, May 5, 2024
Homeधुळेचोरीला गेलेल्या ट्रकचा सहा तासात लागला तपास

चोरीला गेलेल्या ट्रकचा सहा तासात लागला तपास

धुळे । प्रतिनिधी dhule

जळगाव एमआयडीसी परिसरातून साडेसात लाख रूपये किंमतीचा चोरलेला मालट्रक अवघ्या सहा तासात तिघा चोरट्यांसह पकडण्यात चाळीसगावरोड पोलिसांना यश आले आहे.

- Advertisement -

जळगाव शहर एमआयडीसी परिसरातून दि.29 ऑगस्ट रोजी एम.एच.19/सी.वाय.5310 क्रमांकाचा मालट्रक तिघा चोरट्यांनी चोरला. यासंदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात भादंवि 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे पोनि धीरज महाजन यांना सदर ट्रक धुळे शहराकडे येत असल्याची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने त्यांनी पथकास कारवाई करण्याच्या सुचना केल्या.

पथकाने चाळीसगावरोड चौफुलीवर सापळा लावून संशयित ट्रक येतांना दिसला. त्याला थांबवून चालकाकडे कागदपत्रांची चौकशी केली असता चालकासह इतर दोघांचे बोलणे बंद झाले. त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पथकाने पोलिसी खाक्या दाखविताच सदर ट्रक जळगाव शहर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्याची कबुली त्यांनी दिली. नवाज सादिक सैय्यद (31), रा.तांबापुरा, साईबाबा मंदीराजवळ, जळगाव, सैय्यद राशीद शेख (22), रा.रामरहीम कॉलनी जवळ, सेंधवा, म.प्र. व आवेखान जहागीर खान (21) रा.इस्लामपुरा, गरीब नवाज नगर, नशिराबाद, जि.जळगाव अशी त्यांनी त्यांची नावे सांगितली. तसेच संशयितांवर जळगाव जिल्ह्यात इतर गुन्हे दाखल असल्याने ते सराईत गुन्हेगार असल्याचे तपासात निष्पन्न झाले. ट्रकसह तिघे सराईत जळगाव शहर एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, एएसपी एस.ऋषीकेश रेड्डी यांचे मार्गदर्शनाखाली चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे पोनि.धीरज महाजन, पोहेकॉ.एस.पी.पाथरवट, पोहेकॉ आर.यू.ठाकुर, ए.व्ही. वाघ, एम.एच.पाटील, पोना.आर. डी.पवार, पोकॉ एस.एस.बेग, ए.आर.शेख, ए.ए.वैराट, एस.बी. सोनवणे, डी.आर.तायडे यांच्या पथकाने केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या