अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
सुपा पोलीस ठाणे हद्दीत एका कंटेनरच्या चालकाने सीएट कंपनीचे टायर परस्पर विक्री करून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 97 टायर व तीन मोबाईल असा एकूण 19 लाख 94 हजार 650 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. अन्सार अहमद नयाबअली (वय 23 रा. प्रतापगड, उत्तरप्रदेश), जैद खान अजिम खान मोहंमद (वय 27 रा. घाटकोपर, मुंबई), शिवलाल हसमुखलाल शहा (वय 58 रा. सुरत, गुजरात), योगेश अरुण गुंजाळ (रा. बेल्हे, ता. जुन्नर, जि. पुणे) व वैभव भगवंता चौधरी (रा. जामगाव, ता. पारनेर,) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
27 डिसेंबर 2024 रोजी कंटेनर (पीबी 13 एडब्ल्यू 5064) वरील चालकाने टायरांची परस्पर विक्री करून विश्वासघात केल्याप्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचा समांतर तपास करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यांनी पहिल्या टप्प्यात इरशाद निशार अहमद (रा. प्रतापगड, उत्तरप्रदेश) आणि अब्दुल कय्युम अब्दुल वहाब शहा (रा. धुळे) यांना अटक करून त्यांच्याकडून दोन लाख 52 हजार रूपये किमतीचे 12 टायर हस्तगत केले होते. यानंतर तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मुंबई येथून संशयित आरोपी अन्सार अहमद नयाब अली आणि जैद खान अजिम खान मोहंमद यांना ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान, त्यांनी गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार जावेद खान, शरिफ खान व जोशेफ अली (सर्व पसार, रा. उत्तरप्रदेश) यांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली. गुन्ह्याच्या सखोल तपासात संशयित आरोपींनी टायर सुरत येथील शिवलाल हसमुखलाल शहा यांच्यामार्फत योगेश गुंजाळ याला विकल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी शिवलाल शहा यास सुरत येथून ताब्यात घेतले. तसेच योगेश गुंजाळ हा साथीदार वैभव चौधरीसह पुण्यात टायर विक्रीसाठी आल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 15 लाख 12 हजार रुपये किमतीचे 72 टायर आणि तीन मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. योगेश गुंजाळ याने उर्वरित टायर सागर रूकारी, दत्तात्रय सोमवंशी, संकेत जाधव आणि राहुल औटी यांना खोट्या बिले दाखवून विकल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी पंचासमक्ष त्यांच्या ताब्यातील चार लाख दोन हजार 650 रुपये किमतीचे 25 टायर हस्तगत केले.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनंत सालगुडे, अंमलदार बापुसाहेब फोलाणे, मनोहर गोसावी, गणेश लोढे, पंकज व्यवहारे, फुरकान शेख, संतोष खैरे, बाळासाहेब गुंजाळ, किशोर शिरसाठ, अमृत आढाव, विशाल तनपुरे, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड, महादेव भांड यांच्या पथकाने केली आहे.