अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
प्रतिबंधित असलेल्या तंबाखूजन्य पदार्थांची छुप्या पध्दतीने विक्री करणार्या चौघांना एमआयडीसी पोलीस व अन्न प्रशासन विभागाच्या संयुक्त पथकाने कारवाई करत पकडले. त्यांच्याकडून दोन लाख 76 हजार 800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. राजेंद्र शामराव वराट (वय 42), आनंद तात्या खैरे (वय 28 दोघे रा. निंबळक, ता. नगर), अमोल धोंडीराम इंगोले (वय 23 रा. घाटसांगवी, ता. जि. बीड, हल्ली रा. निंबळक), महेश भिमराव घोलप (वय 32 रा. निंबळक) अशी पकडलेल्या चौघांची नावे आहेत. त्यांच्याविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेंद्र वराट आणि आनंद खैरे हे निंबळक येथे चोरीछुपके मावा तयार करून विक्री करत आहेत, अशी माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना मिळाली होती.
मिळालेल्या माहितीच्या आधारे अन्न प्रशासन विभागाच्या अधिकार्यांना सूचित करून त्यांच्या पथकासह निंबळक शिवारातील गजानन पान स्टॉल येथे छापा टाकला असता राजेंद्र वराट आणि अमोल इंगोले हे बेकायदेशीररित्या मावा व सुगंधी तंबाखू विक्री करताना आढळले. दुकानाची झडती घेतली असता 12 हजार 300 रूपये किमतीचा विमल पानमसाला व सुगंधी तंबाखू जप्त करण्यात आला. पुढील चौकशीत संशयित आरोपींनी कबूल केले की मोठा साठा आनंद खैरे याच्या घरी ठेवलेला आहे. त्यानुसार पोलिसांनी तेथे झडती घेतली असता आनंद खैरे आणि महेश घोलप यांच्या ताब्यात मोठ्या प्रमाणावर सुगंधी तंबाखू, मावा आणि त्यासंबंधीचे साहित्य आढळून आले. सहायक निरीक्षक चौधरी, अन्न सुरक्षा अधिकारी राजेश बडे, उपनिरीक्षक विनोद परदेशी, अंमलदार राजू सुद्रिक, नितीन उगलमुगले, साबीर शेख, नंदकिशोर सांगळे यांच्यासह अन्न प्रशासन विभागाचे शुभम भसमे, सागर सोनार यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली आहे.