अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी महत्त्वाच्या आणि संवेदनशील ठाण्यांची जबाबदारी नव्या अधिकार्यांवर सोपवली आहे. यामध्ये तोफखाना पोलीस ठाण्याची जबाबदारी पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ यांच्याकडे देण्यात आली आहे. मात्र, त्यांनी पदभार स्वीकारताच गंभीर गुन्ह्यातील आणि जामिनावर असलेले गुन्हेगार थेट ठाण्यात येऊन सत्कार करतात, भांबळ यांच्याकडून त्यांना चहापान केला जातो, ही बाब पोलीस दलात आणि नागरिकांमध्ये जोरदार चर्चेचा विषय ठरली आहे.
तत्कालीन उपअधीक्षक अमोल भारती यांच्या नेतृत्वात तोफखाना पोलीस ठाण्याचे तात्कालीन प्रभारी निरीक्षक आनंद कोकरे यांनी गुन्हेगारांवर वचक निर्माण केला होता. खून, खंडणी, दरोडा, मोक्का अशा गुन्ह्यांतील आरोपीदेखील त्यांच्या काळात डोके वर काढू शकले नाहीत. मात्र अलीकडे अधिकार्यांच्या बदलानंतर परिस्थिती बदलल्याचे दिसून येते. डॉ. दिलीप टिपरसे यांनी शहर उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून पदभार घेतल्यानंतर त्यांनी नियमभंग करणार्यांवर कारवाई सुरू केली असली, तरी सराईत गुन्हेगारांवर दंडुका चालत नाही, अशी टीका होतांना दिसत आहे. कोकरे यांच्या जागी तोफखाना ठाण्यात आलेल्या भांबळ यांनी पदभार घेतल्यानंतर सत्कारासाठी रांग लागली आहेत. त्यात गुन्हेगारही सहभागी आहेत.
काही गंभीर गुन्ह्यातील आरोपींनी थेट ठाण्यात येऊन त्यांचा सत्कार केला, चहापान केले. याशिवाय, या गुन्हेगारांसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पोलीस दलात तसेच शहरभरात चर्चांना उधाण आले आहे. ज्यांनी एकेकाळी गुन्हेगारांचा वचक मोडीत काढला, त्याच गुन्हेगारांनी आता ठाण्यात येऊन अधिकार्यांचा सत्कार करावा, अधिकार्यांनी त्यांना चहापान करावे, हा कोणता संदेश? असा प्रश्न उपस्थित होत आहे. गुन्हेगारांना वेळीच आवरले नाही, तर शहराची कायदा-सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते, अशी चर्चा सुरू आहे.
गुन्हेगारांवर ‘दंडुका’ उगारावा !
तत्कालीन उपअधीक्षक भारती यांच्या काळात गुन्हेगारांचा वचक मोडीत निघाला होता. आता डॉ. टिपरसे यांनी पदभार घेतल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आता डॉ. टिपरसे यांनी नियमभंग करणार्यांप्रमाणेच या सराईत गुन्हेगारांवरही दंडुका उगारावा, अशी मागणी होत आहे.





