Friday, May 3, 2024
Homeनाशिकनिफाडच्या सात गावात शुकशुकाट; रस्ते बंद, दुध, भाजीपाला, किरणा मिळालाच नाही

निफाडच्या सात गावात शुकशुकाट; रस्ते बंद, दुध, भाजीपाला, किरणा मिळालाच नाही

निफाड | प्रतिनिधी

लासलगाव जवळील पिंपळगाव नजिक येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने हा तरुण ज्या-ज्या गावात पाव विक्रीसाठी फिरला अशी सात गावे पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आली आहेत.

- Advertisement -

या गावात येणारे रस्ते बॅरिकेटस लावून तर कुठे काट्या टाकून, नाल्या खोदून बंद करण्यात आले आहेत. लॉकडाऊनमुळे कोरोनाचा आपले गाव परिसरात शिरकाव होणार नाही. गावातील नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन गावचे सरपंच ग्रामसेवक करतांना दिसत आहेत.

निफाड तालुक्यातील पिंपळगाव नजिक येथील कोरोना पॉझिटिव्ह तरुण हा पाव विक्री साठी पिंपळगाव नजिक,लासलगाव,विचुर, नैताळे, खडकमाळेगाव, सारोळे खुर्द, रानवड या गावच्या परिसरात फिरल्याची बाब उघड झाल्याने पोलीस प्रशासन, महसूल विभाग तसेच स्थानिकांनी गावात येणारे रस्ते बॅरीकेट लावून बंद केले आहेत.

तर अनेक रस्त्यावर पाईप टाकण्यात आले आहेत. काही ठिकाणी काटेरी झुडपे टाकून रस्ते बंद केले आहेत. सात गावामध्ये दूध किराणा भाजीपाला जनरल स्टोअर्स हि दुकाने तीन दिवसांपासून बंद आहेत.

तर डॉक्टर मेडिकल बंद असलेली आरोग्य सेवा पुन्हा सुरु करण्यात आली आहे.  या परिसरातील निमगाव वाकडा, खडकमाळेगाव येथील वैद्यकीय अधीकारी तसेच लासलगाव ग्रामिण रुग्णालयाचे पथक प्रत्येक घरात जाऊन आरोग्य तपासणी मोहीम राबवित आहे.

गावात फवारणी करण्याबरोबरच स्वच्छता मोहीम हाती घेऊन गावात जनजागृती केली आहे. एरव्ही कुणाचीही भीती न बाळगता गावात बिनधास्त फिरणाऱ्यांना मात्र, या कोरोना रुग्णामुळे चांगलाच चाप बसला आहे.

त्यामुळे नागरिक स्वतःला घरात स्वयंस्फूर्तीने कोंडून घेत आहेत. तालुक्यातील गावे, वाड्या वस्त्या कोरोनाच्या धास्तीने शांत झालेल्या दिसून येतात.

याच लॉकडाऊन चा फटका शेतीव्यवस्ययाला बसल्याचे दिसत आहे. मजूर वर्गावर देखील उपासमारीची वेळ आली आहे. शेतात काढणीला आलेला गहू, हरभरा ,कांदा भाजीपाला मका हा शेतातच वाळू लागला आहे.

त्यामुळे शेतात जावे तर कोरोनाची भीती अन न जावे तर हातात आलेले पीक वाया जाण्याची भीती अशी द्विधा मनस्थितीत शेतकरी सापडला आहे.

तालुक्यातील सायखेडा चांदोरी निफाड पिंपळगाव बसवंत, ओझर, सुकेणे उगाव देवगाव खेडलेझुगे, म्हाळसाकोरे, शिंगवे कोठूरे नांदूरमध्यमेश्वर, चाटोरी या मोठया गावासह खेडेगावात देखील कडकडीत बंद पाळला जात आहे.  मात्र, स्वच्छतेच्या दृष्टीने कार्यवाही होतांना दिसत नाही. त्यामुळे कोरोनाला हरविण्यासाठी सर्वांनी सज्ज होऊन घरात थांबणे गरजेचे आहे.

लॉकडाऊनमुळे अडचणी येत असल्या तरी सुरक्षिततेच्या दृष्टीने चांगले आहे. त्यामुळे आणखी काही दिवस नागरिकांनी अडचणींचा सामना करून घरातच थांबावे. आज तरी आपल्या गावात एकही रुग्ण नाही. ही समाधानाची बाब आहे कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी प्रत्येकाने काळजी घ्यावी ग्रामपचायत सर्व तोपरी खबरदारी घेत आहे.

दत्ता रायते संचालक लासलगाव बाजार समिती

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खडकमाळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्यास या इमारतीचा उपयोग होऊ शकतो. येते औषधे व पुरेशी साधन सामुग्री उपलब्ध करून घ्याव्यात त्याबाबत मी आरोग्य मंत्री व पालक मंत्री यांचेशी व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोललो आहे. आता त्यात सुधारणा होत असून या आरोग्य केंद्रातून परिसरातील गावच्या नागरिकांना पुरेशी आरोग्य सेवा मिळावी.

शिवाजी सुराशे, उपसभापती निफाड पंचायत समिती

- Advertisment -

ताज्या बातम्या