Wednesday, June 10, 2026
Homeनगरडीजेच्या गोंगाटात हरवत चालले पारंपरिक बँड, सनई-संबळे वादक

डीजेच्या गोंगाटात हरवत चालले पारंपरिक बँड, सनई-संबळे वादक

एकरुखे |वार्ताहर| Ekrukhe

ग्रामीण भागात सुरू असलेल्या लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक ब्रास बँड, सनई व संबळे वादकांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम झाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. लग्न समारंभांमध्ये डीजे संस्कृतीचा वाढता प्रभाव आणि कर्कश आवाजाच्या आकर्षणामुळे पारंपरिक वाद्यसंस्कृती हद्दपार होत असून अनेक कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे.

- Advertisement -

पूर्वी लग्नसमारंभ म्हटले की, ब्रास बँडचा दणदणीत ताफा, एकसारखी वेशभूषा आणि सनईच्या सुरावटींनी वातावरण भारून टाकलेले असायचे. येवला, मनमाड, मालेगाव आणि परिसरातील गावांमध्ये 30 ते 40 जणांचा बँड पथक लग्नात हमखास दिसायचे. तसेच ग्रामीण भागात स्थानिक पातळीवर 10 ते 15 जण एकत्र येऊन सनई आणि संबळे वाजवून पारंपरिक पद्धतीने लग्न सोहळ्याला रंगत आणायचे. मात्र सध्या या सर्व परंपरांना डीजेने मागे टाकले आहे. मोठ्या आवाजातील गाणी, आकर्षक लाईट्स आणि डान्स यामुळे नव्या पिढीचा कल डीजेकडे वाढत चालला आहे.

परिणामी, बँड वादक, सनई व संबळे वाजवणारे कलाकार यांच्याकडे कामाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले आहे. अनेकांना तर पूर्णपणे काम बंद झाल्याने बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे डीजेच्या आवाजावर कोणतेही ठोस नियंत्रण नसल्याने अनेक ठिकाणी कर्कश ध्वनीमुळे त्रास होतानाही तो सर्रास वापरला जात आहे. याउलट पारंपरिक बँडमध्ये मध्यम आवाजात सुरेल संगीत सादर होत असे. ज्यामुळे लग्न सोहळ्याला एक वेगळीच शालीनता लाभत होती. आज मात्र ही शालीनता हरवत चालल्याची खंत ज्येष्ठ नागरिक व्यक्त करत आहेत.

बँड वादक आणि पारंपरिक कलाकार सांगतात, या व्यवसायात आयुष्य घालवले असून दुसरे कोणतेही काम त्यांना सहज मिळत नाही. त्यामुळे सध्या त्यांच्यासमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. पूर्वी लग्नसराईच्या काळात आम्हाला सतत काम मिळायचे. पण आता महिनोनमहिने काम मिळत नाही, अशी व्यथा काही कलाकारांनी व्यक्त केली. पारंपरिक कला आणि संस्कृती जपण्यासाठी या कलाकारांना पुन्हा संधी देण्याची गरज असल्याचे मत जाणकार व्यक्त करत आहेत.

तसेच प्रशासनाने डीजेच्या आवाजावर नियंत्रण आणून पारंपरिक बँड आणि वादकांना प्रोत्साहन देण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही पुढे येत आहे. एकूणच आधुनिकतेच्या लाटेत पारंपरिक वाद्यसंस्कृती हरवत चालली असून, या कलेला आणि कलाकारांना वाचवण्यासाठी समाजाने आणि प्रशासनाने एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज अधोरेखित होत आहे.

ताज्या बातम्या

Shirdi : तुकाराम मुंढेंचा झंझावात आता शिर्डीत!

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात भेसळखोरांविरोधात धडक कारवाया सुरू केली असल्याने या झंझावाताचे लोण...