मुंबई । प्रतिनिधी Mumbai
राज्य प्रशासनात फेरबदलाचा सपाटा लावलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी आणखी आठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. आठ दिवसांपूर्वी बदली झालेल्या प्रदीप पी. यांची नियुक्ती आता महाराष्ट्र मेरीटाईम मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून झाली आहे. तर सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव एन. नवीन सोना यांची नियुक्ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रधान सचिव म्हणून करण्यात आली आहे.
सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार मत्स्यव्यवसाय आयुक्त अतुल पाटणे यांची बदली पर्यटन विभागाच्या सचिवपदी झाली आहे. तर वित्त विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन. यांची बदली कृषी आणि पशुसंवर्धन विभागाचे सचिव म्हणून करण्यात आली आहे. नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या रिचा बागला यांची नियुक्ती वित्त विभागात (लेखा आणि कोषागारे) प्रधान सचिवपदी करण्यात आली आहे. तर वस्त्रोद्योग विभागाच्या सचिव म्हणून अंशु सिन्हा यांची नेमणूक झाली आहे.
वस्त्रोद्योग विभागाचे सचिव वीरेंद्र सिंग यांची बदली सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव (२) म्हणून करण्यात आली आहे. महाराष्ट्र मेरीटाईम मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी माणिक गुरसल यांची बदली नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त म्हणून झाली आहे.