मुंबई | प्रतिनिधी Mumbai
मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून देवेंद्र फडणवीस यांनी राज्य प्रशासनात फेरबदल चालवले असून गुरुवारी १२ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले. आज जारी झालेल्या आदेशानुसार काही दिवसांपूर्वी बेस्टच्या व्यवस्थापकीय संचालकपदी बदली झालेले हर्षदीप कांबळे यांची नियुक्ती आता सामाजिक न्याय विभागाच्या प्रधान सचिवपदी करण्यात आली आहे. तर सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांची बदली वन विभागात तर वन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी यांची नियुक्ती उच्च आणि तंत्रशिक्षण विभागात झाली आहे.
उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांची बदली कृषी विभागात झाली आहे. दोन दिवसांपूर्वी शालेय शिक्षण खात्यातून बदली झालेल्या आय. ए. कुंदन यांची नियुक्ती कामगार विभागाच्या प्रधान सचिव म्हणून करण्यात आली आहे. कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल यांची बदली पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाच्या प्रधान सचिवपदी झाली आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण विभागातील रुसाचे प्रकल्प संचालक डॉ. निपुण विनायक यांची नेमणूक सार्वजानिक आरोग्य विभागाच्या सचिव १ पदी करण्यात आली आहे. माहिती तंत्रज्ञान विभागाच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज यांची बदली अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या सचिवपदी झाली आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा
पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची बदली जमाबंदी आयुक्त आणि भूमी अभिलेख संचालक या पदावर करण्यात आली आहे. क्रीडा आणि युवक कल्याण विभागाचे आयुक्त म्हणून एच. एस. सोनवणे यांची नियुक्ती झाली आहे. पुणे जिल्हा [परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांची बदली सातारा जिल्हाधिकारी म्हणून झाली आहे. तर सातारचे जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांची बदली पुणे जिल्हाधिकारीपदी करण्यात आली आहे.