Wednesday, July 29, 2026
HomeनगरAhilyanagar : महिलांच्या सुरक्षेसाठी नगरमध्ये तासभर रास्तारोको

Ahilyanagar : महिलांच्या सुरक्षेसाठी नगरमध्ये तासभर रास्तारोको

बसमधील छेडछाडीच्या घटनेनंतर सकल हिंदू समाज आक्रमक

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

नगर- नाशिक शिवशाही बसमध्ये वाहकाने प्रवासी महिलेची छेड काढल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल झाल्यावर आ. संग्राम जगताप हे आक्रमक झाले. या विरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीने सोमवारी (11 मे) सकाळी कायनेटिक चौकात आ. जगताप यांच्या नेतृत्वाखाली तासभर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. भर दुपारच्या रणरणत्या उन्हात तापलेल्या रस्त्यावर शेकडो हिंदू महिलांसह नागरिकांनी उत्स्फूर्तपणे या रास्ता रोको आंदोलनात सहभाग घेतला.

- Advertisement -

दरम्यान, प्रवासी महिलेची छेड काढणार्‍या वाहकाविरूध्द गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत रस्त्यावरून उठणार नाही व आंदोलन मागे घेणार नाही, अशी आक्रमक भूमिका आ. जगताप यांनी घेतल्यावर पोलीस प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली. तासाभराने पोलीस अधिकार्‍यांनी सबंधित वाहकाविरूध्द गुन्हा दाखल केल्याची प्रत आ. जगताप यांना दिल्यावर हे रास्तारोको आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी आक्रमक झालेल्या शेकडो हिंदू नागरिकांनी दिलेल्या जय श्रीराम…., भारतमाता की जय, जो हिंदू हित पे बात करेगा वही देश पे राज करेगा.. अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

यावेळी बोलताना आ. जगताप म्हणाले, हिंदू महिला भगिनींची सुरक्षितता धोक्यात आली आहे. या विरोधात सर्व हिंदू महिला व नागरिकांनी जागरूक होणे आवश्यक आहे. महिलांनी एका विशिष्ट समाजाचे षडयंत्र समजून घेऊन वेळीच सावध व्हावे, हा समाज सातत्याने हिंदू समाजावर अत्याचार करत आहे. आता हे सहन न करता जशास तसे उत्तर देण्याची वेळ आली आहे, असे आवाहन आ.जगताप यांनी केले. यावेळी महापौर ज्योती गाडे, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा युतीचे सर्व नगरसेवक व नगरसेविका, महिला पदाधिकारी व विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वाहक निलंबित; गुन्हा दाखल
दरम्यान, सदरचा प्रकार तारकपूर बस डेपो आगारातील ई-शिवाई बसमध्ये घडला असल्याचे समोर आले आहे. एका महिला प्रवाशासोबत अश्लील कृत्य केल्याप्रकरणी वाहकाविरोधात सोमवारी (11 मे) तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नूर मोहम्मद सिराज पटेल असे त्या वाहकाचे नाव आहे. यासंदर्भात डेपो मॅनेजर अभिजीत चौधरी यांनी फिर्याद दिली आहे. तसेच संबंधित वाहकाला विभागीय चौकशीनंतर निलंबित करण्यात आले आहे. फिर्यादीत म्हटले आहे, 7 एप्रिल 2026 रोजी ई-शिवाई बस ही अहिल्यानगर-नाशिक व नाशिक-अहिल्यानगर या मार्गावर धावत होती. या बसवर वाहक म्हणून पटेल याची नियुक्ती होती. प्रवासादरम्यान एका महिला प्रवाशाला उलटीचा त्रास होत असल्याने वाहकाने चालकाकडून प्लास्टिक पिशवी घेत ती संबंधित महिलेला दिली. त्यानंतर महिला प्रवासी मागील सीटवर जाऊन बसली. काही वेळाने वाहक पटेल देखील तिच्या शेजारी जाऊन बसल्याचे आणि महिला प्रवासीसोबत संशयास्पद तसेच अश्लील हालचाली करत असल्याचे निदर्शनास आले असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. बसमधील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. या फुटेजमध्ये नूर पटेल हा संबंधित महिलेसोबत अश्लील कृत्य करताना दिसून आल्याचा दावा फिर्यादीत करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या