नाशिक । प्रतिनिधी Nashik
शासकीय आश्रमशाळांमधील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या सोयीसुविधा व त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी आदिवासी विकासमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या संकल्पनेतून ‘संवाद चिमुकल्यांशी’ अभियान राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत शुक्रवारी (दि.7) प्रत्येक शासकीय आश्रमशाळेत प्रकल्प कार्यालयातील एक अधिकारी मुक्कामी होते. मंत्री डॉ. उईके हे यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील बोटोणी येथील आश्रमशाळेत तर आयुक्त नयना गुंडे ह्या नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील डोल्हारे शासकीय आश्रमशाळेत निवासी होते.
आदिवासी विकास विभागाच्या राज्यात 497 शासकीय आश्रमशाळा असून, त्याठिकाणी सुमारे दोन लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. संवाद चिमुकल्यांशी’ अभियानात मंत्रालयीन अधिकारी, आदिवासी विकास आयुक्तालय, अपर आयुक्त व प्रकल्प अधिकारी कार्यालयातील अधिकारी सहभागी झाले होते. आश्रमशाळेत मुक्कामी आलेल्या मंत्री, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकारी वर्गाचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. अनेक आश्रमशाळेत मान्यवरांचे लेझीम व पारंपरिक ढोलताशांच्या गजरात आगमन झाले.
आश्रमशाळेत दुपारी दाखल झालेल्या काही अधिकार्यांनी विद्यार्थ्यांसोबत मैदानी खेळाचा आनंद लुटला. विद्यार्थ्यांसोबत पंगतीत बसून मंत्री आणि अधिकार्यांनी भोजनाचा आस्वाद घेतला. खेळ व भोजनाच्या माध्यमातून अधिकार्यांनी विद्यार्थ्यांना बोलते करण्याचा प्रयत्न केला. रात्री मुक्कामी असलेल्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसोबत मंत्री व अधिकारी यांनी चर्चा करत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
दरम्यान, बोटोणी येथील आश्रमशाळेतूनच मंत्री डॉ.उईके यांनी राज्यातील सर्व आश्रमशाळांमध्ये मुक्कामी असलेल्या खासदार, आमदार व अधिकार्यांशी संवाद साधला. आश्रमशाळा दर्जेदार, गुणवत्तापूर्ण बनविण्यासोबतच आदिवासी विद्यार्थ्यांच्या पालकांचा आश्रमशाळेबद्दल असलेला विश्वास अधिक दृढ करण्यासाठी तसेच आदिवासी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास साधण्यासाठी सामुहिकपणे प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
विद्यार्थ्यांला आश्रमशाळेत टाकताना येथे उत्तम दर्जाचे शिक्षण व सुविधा उपलब्ध असल्याची भावना पालकांच्या मनात निर्माण झाली पाहिजे. त्यासाठी आश्रमशाळांचे अधिक्षक, शिक्षक यांनी विशेष प्रयत्न व अध्यापन करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना पुढील उच्च शिक्षण देखील एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्याचा आपला प्रयत्न आहे. अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना सर्वोत्तम सुविधा देणारा विभाग म्हणून आदिवासी विकासची ओळख निर्माण केली जाईल.
-डॉ. अशोक उईके, मंत्री आदिवासी विकास विभाग
या सुविधांची पडताळणी
विद्यार्थ्यांची उपस्थिती, पटावरील संख्या, शिक्षक / कर्मचार्यांची माहिती, अन्नधान्याचा दर्जा, कोठीगृह रजिस्टर, अन्नधान्य व भाजीपाला साठवणुकीची पध्दत, स्वयंपाकाचा गॅस, शेगडीची व्यवस्था, आश्रमशाळा व वसतीगृहातील पिण्याच्या पाण्याची व आंघोळीच्या गरम पाण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्यासाठी आर.ओ. फिल्टर मशीन लावले आहे का, ते सुस्थितीत आहे का, मुला-मुलींकरीता स्वतंत्र स्नानगृह व शौच्छालय, तेथील स्वच्छता, मुलींना सॅनॅटरी नॅपकीन दिले जाते का, सॅनॅटरी नॅपकीन वेंडीग मशीन लावले आहे का, विद्यार्थीनींच्या वसतीगृहात धोक्याची सुचना देणारी प्रणाली कार्यान्वित केली आहे का, मुलींना वसतीगृहात असुरक्षित तर वाटत नाही ना, विद्यार्थ्यांना देण्यात येणार्या गाद्या, बेडशीट, उशी सुस्थितीत आहे का, वसतीगृहात व आश्रमशाळेत खिडक्या, लाईट व्यवस्था आदी.