Sunday, September 27, 2026
Homeब्रेकिंग न्यूजसमृद्धी महामार्गावर ट्रकची कारला धडक; एक जण ठार; एक गंभीर जखमी

समृद्धी महामार्गावर ट्रकची कारला धडक; एक जण ठार; एक गंभीर जखमी

वावी । वार्ताहर Vavi

- Advertisement -

नागपूर–मुंबई समृद्धी महामार्गावरील चॅनेल क्रमांक ५४१, मलढोण शिवार येथे शुक्रवारी (दि. १०) मध्यरात्री भीषण अपघात झाला. नादुरुस्त झालेल्या एर्टिगा कारच्या मदतीसाठी आलेल्या महामार्ग देखभाल कर्मचाऱ्याला भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर कारचालक गंभीर जखमी असून त्याच्यावर शिर्डी येथील साईबाबा संस्थान रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथून मुंबईकडे जाणारी एर्टिगा कार (क्र. MH 04 HX 2953) समृद्धी महामार्गावरील मलढोण शिवाराजवळ अचानक नादुरुस्त झाली. त्यानंतर चालकाने महामार्ग वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून मदतीची विनंती केली.

समृद्धी महामार्गाच्या देखभालीचे काम डीबीएल कंपनीकडे असल्याने कंपनीचा देखभाल कर्मचारी मुन्नालाल प्रजापती याला तातडीने घटनास्थळी पाठविण्यात आले. प्रजापती व कारचालक हे दोघे वाहनाच्या मागे बॅरिकेडिंग करून इतर वाहनांना इशारा देत असतानाच छत्रपती संभाजीनगरकडून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या लाकडाचे ओंडके भरलेल्या ट्रकने (क्र. MH 05 BD 7677) त्यांच्या वाहनाला आणि दोघांनाही जोरदार धडक दिली.

या भीषण धडकेत मुन्नालाल प्रजापती यांचा जागीच मृत्यू झाला. तर एर्टिगा कारचा चालक गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने शिर्डी येथील साईबाबा संस्थान रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वृत्त लिहिपर्यंत जखमी चालकाची ओळख पटलेली नव्हती.

दरम्यान, अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला होता. मात्र वाहतूक नियंत्रण कक्षाचे प्रभारी अधिकारी मिलिंद सरवदे यांनी तातडीने शोधमोहीम राबवून मुंबईच्या दिशेने पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या ट्रकचालकाला पकडले. त्यानंतर त्याला वावी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

वावी पोलिसांनी ट्रकचालक गौरव वाल्मीक जायभावे (रा. छत्रपती संभाजीनगर) याला अटक करून ट्रक जप्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गोरे करीत आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : राजकारणात टीका करताना लक्ष्मणरेषेचे भान ठेवा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar राजकीय टीका करताना कौटुंबिक विषय टाळले पाहिजेत. आमच्यावर राजकीय टीका करा, आमच्या कार्यपद्धतीवर किंवा सरकारच्या कामावर टीका करा, मात्र कौटुंबिक वादात...