Tuesday, October 6, 2026
Homeदेश विदेशइटलीमध्ये दोन भारतीयांची हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले

इटलीमध्ये दोन भारतीयांची हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले

बर्गामो । Bergamo

इटलीतील बर्गामो शहरात असलेल्या गुरुद्वारा परिसरात भारतीय नागरिकांना लक्ष्य करून करण्यात आलेल्या भीषण गोळीबारामुळे खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात दोन भारतीय नागरिकांचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. ‘ला सिसिलिया’च्या अहवालानुसार, ही धक्कादायक घटना मध्यरात्रीच्या सुमारास ‘गुरुद्वारा माता साहिब कौर जी’ समोरील चौकात घडली. या घटनेने परदेशात स्थायिक असलेल्या भारतीय समुदायामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

- Advertisement -

या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची ओळख पटली असून, राजिंदर सिंह आणि गुरमित सिंह अशी त्यांची नावे आहेत. हे दोघेही भारतीय वंशाचे रहिवासी होते. घटनेच्या वेळी ते गुरुद्वारात दर्शन घेऊन बाहेर पडत असताना दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांकडे वाहन होते आणि गोळीबार केल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळावरून पळ काढला. विशेष म्हणजे, या हल्लेखोरांपैकी एक व्यक्ती भारतीय वंशाचीच असल्याचे सांगण्यात येत आहे.

गोळीबारापूर्वी आरोपी आणि पीडितांमध्ये काही कारणावरून वाद झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हल्लेखोर देखील नियमितपणे या गुरुद्वारात येत असल्याचे समजते. या हल्ल्यात तिसऱ्या एका व्यक्तीलाही गोळी लागली असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. सध्या त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून तब्बल १० रिकाम्या पुंगळ्या जप्त केल्या आहेत, ज्यावरून हल्ल्याची भीषणता स्पष्ट होते.

इटली पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून, हा हल्ला पूर्व नियोजित कट असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. हल्लेखोरांनी गुन्ह्यासाठी योग्य वेळेची आणि ठिकाणाची निवड केल्याचे दिसून येते. आरोपींच्या अटकेसाठी इटली प्रशासनाने संपूर्ण परिसरात मोठे सर्च ऑपरेशन राबवले आहे. तसेच, घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या लोकांचे जबाब नोंदवून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे.

परदेशात गेल्या काही दिवसांपासून भारतीय नागरिकांना लक्ष्य करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशातच वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या गुरुद्वारा परिसरात झालेल्या या खुनी हल्ल्यामुळे स्थानिक भारतीयांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. हल्लेखोरांना पकडण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांपुढे उभे असून, या प्रकरणाचा तपास आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील लक्ष वेधून घेत आहे. पोलीस या वादामागे नेमके काय कारण होते, याचा शोध घेत आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेसाठी 369 उमेदवारी अर्ज

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar गेल्या महिन्याभरापासून गाजत असलेल्या अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सोमवार (दि. 5) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत 903 अधिक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज...