नागपूर | Nagpur
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात प्रथमच दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेतेपद नसताना त्याच मुद्दयावरून राजकारण तापले आहे. पाशवी बहुमताच्या भरवशावर सरकार मुजोर झाले आहे. कायद्यात नसतानाही दोन उपमुख्यमंत्री आहेत, मग दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेते का नाहीत असा सवाल विरोधकांनी केला. शिवसेनेचे (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर व विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची भेट घेऊन दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती करण्यासंदर्भात निवेदन दिले. दोन्ही पदांसाठी विरोधकांनी दोन आमदारांच्या नावांची शिफारस केली असून दोन्ही सभागृहाच्या प्रमुखांनी त्यावर अद्याप कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांपुढे नाराजी व्यक्त केली.
पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, सध्या सुरू असलेले अधिवेशन संपण्यापूर्वी दोन्ही सभागृहांना विरोधी पक्षनेता मिळावा, अशी आमची अपेक्षा आहे. आम्ही जनतेचे प्रश्न मांडत आहोत. ते आमचे कर्तव्य आहे. परंतु, विरोधी पक्षनेत्याला एक दर्जा असतो. त्याला एक मान असतो, तो प्रशासनाशी, अधिकाऱ्यांशी अधिकाकाराने बोलू शकतो, प्रश्न विचारू शकतो. मिळालेल्या माहितीच्या आधारे सरकारला जाब विचारू शकतो. मात्र, हे सरकार विरोधी पक्षनेता नको या विचारांचे दिसत आहे, या शब्दांत उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला.
उध्दव ठाकरे पुढे म्हणाले, विधानसभा अध्यक्ष व सभापतींनी सांगितले की आमच्या मनातही त्यासंदर्भात विचार चालू आहे. आम्ही त्यावर लवकरात लवकर निर्णय घेऊ. मागील अधिवेशनावेळी देखील त्यांनी आम्हाला हेच सांगितले होते. लवकरात लवकर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यांचा तो दिवस काही उजाडला नाही.”
लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी सभागृहात विरोधी पक्षनेता हवा
लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी सभागृहात विरोधी पक्षनेता असायला हवा. ते पद आहे, मात्र त्या पदावर माणूस नेमलेला नाही. त्यामुळे लवकरात लवकर विरोधी पक्षनेता नेमावा. माझे या सरकारला आणि दोन्ही सभागृहांच्या प्रमुखांना एकच सांगणे आहे की नियमांची आडकाठी पुढे कराल तर मग मी उपमुख्यमंत्रिपदाचा विषय काढेन, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.
“मी उपमुख्यमंत्रिपदाचा विषय त्यांच्या कानावर घातला आहे. कारण ते पदही संवैधानिक नाही. जर तुम्ही विरोधी पक्षनेतेपदापुढे नियमाची आडकाठी आणाल तर मग आम्ही उपमुख्यमंत्रिपदाला विरोध करू. काहीजण आपल्या नावापुढे उपमुख्यमंत्री हे बिरुद मिरवत आहेत. नको त्या लोकांच्या नावापुढे हे बिरूद लावले जात आहे. ते पदही ताबडतोब रद्द करायला हवे.”
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील क्लिक करा





