मुंबई | Mumbai
उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरुन उपहासात्मकपणे टीका केली असून, एक कोणीतरी बाबा मला मारले म्हणून दिल्ली गेले असा टोला नाव न घेता लगावला आहे. तसेच जे दिवटे निघाले आहेत त्यांना मशालीचे महत्त्व समजणार नाही अशी टीकाही एकनाथ शिंदेंच्या शिवसेना नेत्यांवर केली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेकडून गुरुवारी (20 नोव्हेंबर) डिजिटल बोर्डचे वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, “आयुष्यात चांगले शिक्षक आणि चांगले शिक्षण मिळाले नाही तर काय होते? हे आपण पाहतो.
उध्दव ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका
गेल्या काही दिवसांपासून शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये नाराजीनाट्य पाहायला मिळत आहे. या नाराजीनाट्यानंतर बुधवारी (19 नोव्हेंबर) एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली. यावर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील निशाणा साधला आहे. “एक कुणीतरी गेलंय बाबा मला मारले म्हणून दिल्लीला. ही लाचारी का?” तर तेच की, त्या वयात चांगले शिक्षक मिळाले असते तर ही वेळ आलीच नसती.” असे म्हणत त्यांनी अमित शहा आणि एकनाथ शिंदे भेटीवर भाष्य केले.
दिवटा म्हणजे त्यांना मशालीचे महत्व समजणार नाही
“मी कार्यक्रम छोटा की मोठा नाही हे बघत नाही, तर कामाची साईज बघतो. आयुष्यात चांगले शिक्षक आणि शिक्षण नाही मिळाले तर काय होते हे दिसत आहे. दिवटी म्हणजे मशाल आणि दिवटा म्हणजे…,” असे उद्धव ठाकरेंनी म्हणताच एकच हशा पिकला. “असे जे दिवटे निघाले आहेत, त्यांना मशालीचे महत्व समजणार नाही आणि कळलेले नाही असा टोला त्यांनी शिंदेंच्या सेनेला लगावला. ही मराठी भाषेची गंमत आहे.” असे म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला. भाषणात उद्धव ठाकरे म्हणाले की, “मी पण आमदार आहे. सगळे आमदार, खासदार आपला फंड वापरतात. पण हा फंड विरोधी पक्षाच्या आमदार, खासदारांना देताना हात आखडता घेतला जातो. त्यांच्या आर्थिक नाड्या आवळल्या जातात. हे सर्व आपण बातम्यांमध्ये वाचतो. पण आता कहर म्हणजे, त्यांच्यातच एकमेकांच्या नसा आळण्याचे काम सुरू झाले आहे.” असे म्हणत त्यांनी महायुतीला टोला लगावला.
सोनम वांगचुकला देशद्रोही ठरवण्यात आले
विधान परिषदेचे शिक्षक आमदार ज.मो. अभ्यंकर यांच्या आमदार निधीतून शाळांना डिजीटल बोर्डचे वाटप करण्यात आले. त्यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, तांत्रिक बाबींमुळे आता शिक्षण बदललं आहे. आम्ही पाटीवर शिकलो आहोत. पाटीवर अक्षर गिरवत मोठे झालो. शिक्षण स्वरूप हेच कालांतराने बदलत गेलं पाहिजे. शिक्षण आणि शिक्षक चांगले मिळाले नाही तर काय होत तर बघा. त्या सोनम वांगचुग यांचे म्हणणे ऐकून न घेत त्यांना जेलमध्ये टाकलं आहे. त्यांना देशद्रोही ठरवण्यात आलं आहे.
कारण घरामध्ये संस्कार नावाचा विषय असतो
“शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माझ्या आजोबांना (प्रबोधनकार ठाकरे) दोघांनाही शालेय शिक्षण पूर्ण करता आले नाही. दोघांनाही इयत्ता सातवीत फी भरण्यास पैसे नाहीत म्हणून शाळा सोडावी लागली. पण शाळा सुटली तरी त्यांचे शिक्षण थांबले नाही. कारण, घरामध्ये संस्कार नावाचा एक विषय असतो. आपण मुलांना संस्कारित करतो. आई-वडिल आपल्या मुलांना स्वतःच्या वागणुकीतून मुलांना संस्कार देतात. आपण जसे वागतो, तशी आपली मुले वागत असतात. आणि मग घराणेशाही म्हणजे तशीच म्हणजे वडिलांनी एवढा घोटाळा की, मुलगा आणखी मोठा घोटाळा करणार आहे. या सर्व गोष्टी संस्कारातून येतात.” असे ते पुढे म्हणाले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




