Thursday, March 13, 2025
HomeनाशिकMahalakshmi Saras -2025 : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात 'उमेद मॉल' उभारणार - मुख्यमंत्री...

Mahalakshmi Saras -2025 : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ‘उमेद मॉल’ उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

२५ लाख 'लखपती दीदी' करण्याचे उद्दिष्ट

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

राज्यभरातील बचत गटांना हक्काचे विक्री साधन उपलब्ध व्हावे यासाठी प्रायोगिक तत्त्वावर राज्यातील दहा जिल्ह्यात १० उमेद मॉल उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी येथे केली. राज्यात आगामी कालावधीत एक कोटी लखपती दीदी करण्याचा सरकारचा संकल्प आहे. सध्या राज्यात १८ लाख लखपती दीदी असून मार्चपर्यंत ही संख्या २५ लाखापर्यंत नेली जाईल, असेही फडणवीस यांनी जाहीर केले.

- Advertisement -

ग्रामविकास आणि पंचायत राज विभागांतर्गत उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्यावतीने ११ ते २३ फेब्रुवारी दरम्यान येथील वांद्रे-कुर्ला संकुलात “महालक्ष्मी सरस विक्री आणि प्रदर्शन’चे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी बोलताना फडणवीस यांनी बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांच्या विक्री व्यवस्थेसाठी राज्यात टप्प्याटप्प्याने प्रत्येक जिल्ह्यात मॉल उभारण्यात येणार असल्याचे घोषित केले.

‘महालक्ष्मी सरस’ हा अत्यंत लोकप्रिय उपक्रम असल्याचे सांगत फडणवीस म्हणाले, ‘उमेदच्या’ माध्यमातून ‘महालक्ष्मी सरस’ हा राज्यभरात महिला बचत गटांना एक हक्काचे व्यासपीठ मिळवून देणारा उपक्रम झाला आहे. महिला बचतगटांची उत्पादने खूप चांगली असतात. पण यांच्या विक्रीसाठी खूप उपाययोजना कराव्या लागतात. यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून जिल्हा परिषदेच्या परिसरात उमेद अभियानाच्या माध्यमातून मॉल उभारण्यात येतील. यासाठी आगामी अर्थसंकल्पात तरतूद केली जाईल. प्राथमिक स्तरावर १० जिल्ह्यांत ‘उमेद मॉल’ उभारण्यात येतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘लखपती दीदी‘ही योजना आणली आहे. ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त आहे त्यांना ‘लखपती दीदी’ म्हटले जाते. आज महाराष्ट्रात ११ लाखापेक्षा जास्त ‘लखपती दीदी’आहेत. लवकरच २५ लाख महिलांना ‘लखपती दीदी’ करण्याचा सरकारचा संकल्प आहे. याशिवाय नजीकच्या कालावधीत एक कोटी महिला लखपती दीदी करण्याचा आमचा निर्धार आहे. बचत गटांच्या माध्यमातून ही चळवळ सुरू झाली आहे. राज्य सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी,लाडकी बहिण योजना, एसटीमध्ये प्रवास सवलत यासह अनेक महिला सक्षमीकरणाच्या योजना आणल्या आहेत.लाडका भाऊ म्हणून लाडक्या बहिणींच्या विकासासाठी सदैव पाठीशी राहणार असल्याची ग्वाही फडणवीस यांनी उपस्थित महिलांना दिली.
यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री योगेश कदम, विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, ‘उमेद’चे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर, उमेदचे मुख्य परिचलन अधिकारी परमेश्वर राऊत यांच्यासह राज्यभरातून बचत गटांच्या महिला उपस्थित होत्या.

महालक्ष्मी सरस प्रदर्शन २३ फेब्रुवारी २०२५ पर्यंत
वांद्रे -कुर्ला संकुलात सुरु असलेल्या महालक्ष्मी सरस या प्रदर्शनाला २३ फेब्रुवारी २०२५ पर्यंत भेट देता येईल. या प्रदर्शनात अनेक प्रकारच्या कलाकुसरीच्या वस्तू, हातमागावर तयार केलेले कपडे, वुडन क्राफ्ट, बंजारा आर्ट, वारली आर्टच्या वस्तूंशिवाय अनेक प्रकारच्या ज्वेलरी, लहान मुलांसाठी लाकडी खेळणी आणि इतर राज्यातील दुर्मीळ वस्तू उपलब्ध आहेत. या प्रदर्शनात एकूण ५०० पेक्षा जास्त स्टॉल लागले असून त्यापैकी ९० फुड स्टॉल आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...