Wednesday, January 15, 2025
Homeक्रीडाUnder 19 Asia Cup 2024 : भारताचा जपानवर दणदणीत विजय

Under 19 Asia Cup 2024 : भारताचा जपानवर दणदणीत विजय

मुंबई | Mumbai

१९ वर्षांखालील पुरुषांच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये (Under 19 Asia Cup 2024) आज भारतीय संघाचा सामना जपान विरूध्द (Ind vs Japan) झाला. या सामन्यात जपानने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता.पाकिस्तान विरुद्ध सलामी लढतीत ४४ धावांनी पराभूत झाल्यानंतर भारतीय संघाने आशिया चषक स्पर्धेमध्ये जबरदस्त कमबॅक केल्याचे दिसून आले. भारताने (India) प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ६ बाद ३४० धावांचा डोंगर उभारला आहे.

- Advertisement -

यात भारताकडून कर्णधार मोहम्मद अमनने (Mohammad Aman) ११६ चेंडूत १२२ धावांची शानदार शतकी खेळी साकारली. या शतकी खेळीमध्ये त्याने ७ चौकार मारले. तसेच कर्णधार मोहम्मद अमन व्यतिरिक्त सलामीवीर फलंदाज आयुष म्हात्रेने २९ चेंडूत ५४ व के पी कार्तिकेयने ५० धावांचे योगदान दिले.तर आंद्रे सिध्दार्थ ३५ धावा केल्या. जपान संघाकडून कीफर यामामोटो आणि ह्यूज केली ने २-२ गडी बाद केले. भारताने विजयासाठी दिलेल्या ३४० धावांना प्रत्यूत्तर देताना जपान संघाने आक्रमक सुरूवात केली. हयूगो केली आणि निहार परमारने पहिल्या विकेटसाठी ५० धावांची सलामी दिली. मात्र हार्दिक राजने निहार परमारला त्रिफळाचित करत भारताला पहिले यश मिळवून दिले.

तर केपी कार्तिकेय ने कोजी हार्ड ग्रावे याला त्रिफळाचित करत जपानला दुसरा धक्का दिला. तो भोपळाही न फोडता तंबूत परतला. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानावर आलेल्या काझुमा काटो शेफर्ड सोबत हयूगो केलीने धावसंख्या पुढे नेली. दोन्ही फलंदाजांचा खेळपट्टीवर जम बसला असे वाटत असतानाच निखिल कुमारच्या गोलंदाजीवर काझुमा काटो शेफर्ड धावचीत झाला. त्याला हार्दिक राजने बाद केले. मात्र ह्यूगो केलीने आपले अर्धशतक पूर्ण केले. पंरतु,हार्दिक राजच्या गोलंदाजीवर तो यष्टीचीत झाला. त्यानंतर ठराविक अंतराने जपान संघाने आपल्या विकेट्स गमावल्या. विशेष म्हणजे जपानने आपली संपूर्ण ५० षटके फलंदाजी केली. मात्र जपान (Japan) संघाला ८ बाद १२८ धावा काढता आल्या.

दरम्यान, जपान संघाकडून चार्ल्स हिंजेने ३५ धावा केल्या.पंरतु,ह्यूगो केली आणि निहार परमार वगळता एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या उभारता आली नाही.भारतीय संघाकडून चेतन शर्मा,केपी कार्तिकेय आणि हार्दिक राजने प्रत्येकी २-२ गडी बाद केले. त्यामुळे २११ धावांनी भारतीय संघाने दणदणीत विजय संपादन केला. या विजयामुळे भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. तसेच भारतीय संघाच्या नेट रनरेट मध्ये सुधारणा झाली आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार मोहम्मद अमान सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. तर भारतीय संघाचा पुढील सामना बुधवारी ४ डिसेंबर रोजी युएई (UAE) विरूध्द होणार आहे.

सलिल परांजपे, नाशिक

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या