नाशिक। प्रतिनिधी Nashik
घरातून बेपत्ता झालेल्या एका ५६ वर्षीय महिलेचा मृतदेह रविवारी दुपारी हिरावाडीतील भोरे नाट्यगृहाजवळील जागेत संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता .
भारती माणिकराव वलटे(वय ५६, रा. पंचवटी) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. भारती या शुक्रवारी हिरावाडी परिसरातून बेपत्ता झाल्या होत्या. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात त्यांची बेपत्ता असल्याची नाेंद पती माणिकराव वलटे यांनी केली हाेती.
तपास सुरु असतानाच, रविवारी (दि. १९) दुपारी हिरावाडीतील भोरे नाट्यगृहाजवळील मोकळ्या जागेत वलटे यांचा मृतदेह आढळून आला. वलटे यांच्या गळ्याभोवती साडी गुंडाळल्याचे आढळून आले. त्यामुळे सुरुवातीस घातपाताची शक्यता वर्तविली गेली.
जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर वलटे यांचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिस आता तपास करत आहेत. मृत वलटे यांचे पती सेवानिवृत्त शिक्षक असून त्यांची दाेन्ही मुले नाेकरी करतात. याबाबत सखाेल तपास सुरु झाला आहे.