Sunday, April 5, 2026
HomeनगरRain Update : अवकाळीचे संकट आता 4 एप्रिलपर्यंत

Rain Update : अवकाळीचे संकट आता 4 एप्रिलपर्यंत

हवामान खात्याच्या नव्या अंदाजामुळे शेतकर्‍यांची चिंता वाढली, गहु, हरभरा काढणी कामाला वेग

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

30 व 31 मार्चला महाराष्ट्राच्या विविध भागात वादळी पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. पण आता 30 मार्चच्या तुलनेत 31 मार्च रोजी एकंदरीत वादळी पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. तर 1 ते 4 एप्रिल दरम्यान वादळी पावसाचे प्रमाण वाढण्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची चिंता आणखी वाढली आहे.

- Advertisement -

30 मार्चपासून राज्यात आभाळी हवामान आणि दुपारनंतर होणार्‍या वादळी पावसाचे नवीन सत्र सुरू होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 30 मार्च रोजी प्रामुख्याने खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातील जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट, वादळी वारे, पाऊस आणि काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे. उर्वरित विदर्भात देखील काही प्रमाणात हवामानात बदल दिसून येऊ शकतो. 30 मार्चच्या तुलनेत 31 मार्च रोजी एकंदरीत वादळी पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, या भागांमध्ये काही प्रमाणात अस्थिर हवामान आणि वादळी पाऊस पडू शकतो.

त्यानंतर 1 ते 4 एप्रिल दरम्यान वादळी पावसाचे प्रमाण वाढण्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे या कालावधीत मध्य महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भातील ठिकठिकाणी आभाळी हवामान, दुपारनंतरचा वादळी पाऊस, आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, हवामान खात्याच्या अंदाजानंतर शेतीच्या कामांनी वेग घेतला आहे. जो गहू हरभरा काढणीला आला आहे. ही पिके काढण्यासाठी शेतकर्‍यांची धावपळ सुरू आहे. सध्या हार्वेटरला प्रचंड मागणी वाढल्याने काढणीसाठी काही ठिकाणी अडचणी येत आहेत. ज्या ठिकाणी लहान क्षेत्र आहेत. तेथे शेतकरी स्वतः काढणी करून पिके सुरक्षित ठेवत आहेत.

दरम्यान, शेतकर्‍यांनी पुढील काही दिवस हवामानाच्या या स्थितीनुसार शेतीची कामे नियोजित करावीत. सध्या रब्बी पिकांची काढणी सुरू असल्याने काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी. तसेच वादळी वारे, पाऊस आणि संभाव्य गारपीटीपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे. मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटाच्या वेळी नागरिकांनी व शेतकर्‍यांनी स्वतःची तसेच पाळीव जनावरांची सुरक्षितता सुनिश्चित करावी. अशा वेळी झाडाखाली, टिनशेडखाली तसेच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ उभे राहणे टाळावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : न्यूड व्हिडीओ स्कँडलचा मास्टरमाईंड एरंडेला कोठडी

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik स्वतःच विणलेल्या जाळ्यात शिकारी कसा अडकतो याचा प्रत्यय नाशिकच्या (Nashik) सातपूर परिसरात (Satpur Area) आला. आपल्या कार्यालयातून टॅब चोरीला गेल्याची...