Saturday, September 26, 2026
HomeनगरAhilyanagar : 21 हजार 564 शेतकर्‍यांच्या 11 हजार हेक्टरवरील पिके भुईसपाट

Ahilyanagar : 21 हजार 564 शेतकर्‍यांच्या 11 हजार हेक्टरवरील पिके भुईसपाट

अकोले, संगमनेरसह श्रीरामपूर, नेवासा, राहाता, कोपरगाव आणि शेवगावमध्ये मोठे नुकसान

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

गेल्यावर्षी पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीतून शेतकरी कसाबसा सावरत असताना आता भर उन्हाळ्यात बेमोसमी पावसाने शेतकर्‍यांची दाणादाण उडवली आहे. मागील 15 दिवसांत आधी सलग तीन दिवस आणि आता सलग दोन दिवसांपासून जिल्ह्यात वादळी वार्‍यासह पाऊस कोसळत आहे. काही ठिकाणी गारपीटही झाली. या पावसात सोमवारी जिल्ह्यातील 9 तालुक्यांत 21 हजार 564 शेतकर्‍यांचे 11 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

- Advertisement -

सोमवारी सांयकाळी व रात्री झालेल्या अवकाळीमुळे जिल्ह्यात 9 तालुक्यांतील 203 गावे बाधित झाली आहेत. या तालुक्यातील 21 हजार 564 शेतकर्‍यांच्या 10 हजार 878 हेक्टर क्षेत्रावरील गहू, कांदा, मका, टरबुज, आंबा, द्राक्षे आदी पिकांचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे या अवकाळी पावसाने संगमनेर, अकोले, श्रीरामपूर, नेवासा, राहाता आणि कोपरगाव तालुक्यातील भाजीपाला, फळबागा उत्पादक पट्ट्याने झोडपून काढले आहे. गेल्यावर्षी जिल्ह्यात सर्वच तालुक्यांना अतिवृष्टीने शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले होते. त्यावेळी खरीपाचे मोठे नुकसान शेतकर्‍यांना सहन करावे लागले होते. खरीप वाया गेल्याने आता रब्बी तरी हाताशी लागेल, अशी आशा शेतकर्‍यांची होती. पण अवकाळीने हातातोंडाशी आलेला घास पुन्हा हिरावून घेतला आहे.

सोमवारी सर्वाधिक नुकसान अकोले तालुक्याचे झाले आहे. 74 गावांमधील 9 हजार 622 शेतकर्‍यांचे 4 हजार 40 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले. त्याखालोखाल श्रीरामपूर तालुक्यात 47 गावे बाधित झाली असून 2 हजार 332 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान होऊन 4 हजार 86 शेतकर्‍यांना फटका बसला आहे. नेवासा तालुक्यातील 37 गावांमधील 4 हजार 112 शेतकर्‍यांचे 2 हजार 365 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. संगमनेर तालुक्यात 12 गावे बाधित झाले असून 2 हजार 106 शेतकर्‍यांचे 1 हजार 217 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे.

राहाता तालुक्यात 15 गावांमधील 965 शेतकर्‍यांचे 622 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. शेवगाव तालुक्यातील 8 गावांमधील 525 शेतकर्‍यांचे 248 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. पाथर्डी तालुक्यात एक गावातील 4 शेतकर्‍यांचे 2 हेक्टर क्षेत्राचे तर कर्जत तालुक्यात 2 गावांतील 4 शेतकर्‍यांचे 3.2 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झालेे. कोपरगाव तालुक्यात 7 गावे बाधित झाले असून 140 शेतकर्‍यांचे 48 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. यात 33 टक्क्यांपेक्षा कमी 2 हजार 244 हेक्टर क्षेत्र असून 4 हजार 434 शेतकरी संख्या आहे. तर 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान 17 हजार 130 शेतकर्‍यांचे 8 हजार 634 हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे.

2 व्यक्तींसह 10 जनावरे दगावली, 23 घरांची पडझड
जिल्ह्यात दोन दिवसांपासून झालेल्या पावसात पाथर्डी आणि राहाता तालुक्यातून प्रत्येक एक असे दोघांचा वीज पडून मृत्यू झाला आहे. तर राहात्यात एकजण जखमी झालेला आहे. यासह राहाता तालुक्यात 9 मोठी जनावरे तर राहुरीत एक असे दहा मोठी जनावरे मृत्यूमुखी पडलेले आहेत. तसेच 12 घरांचे अंश: पडझड झालेली असून यात नेवासा 3, पारनेर 1, पाथर्डी 4, राहाता 12 अशा 23 घरांची पडझड, संगमनेर तालुक्यात सहा ठिकाणी जनावरांचे गोठे पडले आहेत.

या पिकांचे झाले नुकसान
आंबा, डाळींब, केळी, द्राक्षे, गहू, कांदा, मका, टरबूज, इतर भाजीपाला पिके, टोमॅटो, झेंडू, शेवंती, पेरू, कोथींबीर, उडीद, हरभरा या पिकांना अवकाळीचा फटका बसला आहे.

असे आहेत बाधित शेतकरी
अकोले 9 हजार 622, श्रीरामपूर 4 हजार 86, नेवासा 4 हजार 112, शेवगाव 525, संगमनेर 2 हजार 106, कोपरगाव 140, राहाता 965 असे जिल्ह्यात एकाच दिवशी अवकाळीमुळे 21 हजार 564 शेतकरी बाधित झालेले आहेत.

ताज्या बातम्या

Devendra Fadnavis : दुष्काळावर मात करण्यासाठी एकजूटीने प्रयत्न – CM फडणवीसांचा...

0
मुंबई | Mumbai दुष्काळी परिस्थितीत राज्यातील शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱी आमच्या मदतीच्या केंद्रस्थानी आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत. आम्ही शेतकऱी बांधवांच्या पाठीशी...