Wednesday, April 22, 2026
Homeनगररब्बीच्या पेरण्यांवर पावसाचे सावट; आतापर्यंत ५१ हजार हेक्टरवर पेरा, वाफसा वाट पाहत...

रब्बीच्या पेरण्यांवर पावसाचे सावट; आतापर्यंत ५१ हजार हेक्टरवर पेरा, वाफसा वाट पाहत असतांना पुन्हा संकट

अहिल्यानगर (प्रतिनिधी)

यंदाच्या रब्बी हंगामातील पेरणीला शेतकऱ्यांनी तयारी सुरू केली असली तरी लांबलेल्या परतीच्या पावसाचा पेरणी रब्बी हंगामावर परिणाम होतांना दिसत आहे. जिल्ह्यात कृषी विभागाने रब्बीसाठी ४ लाख १५ हजार १५५ हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट प्रस्तावित केलेले असून दिवाळीपर्यंत नवीन ऊस लागवडीसह ज्वारी, हरभरा, तेलबियांची ५१ हजारांहून अधिक हेक्टरवर पेरणी झालेली आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी शेतात वाफसा होत असून पेरण्याला सुरुवात झाली आहे. पुढील काही दिवसात रब्बीच्या पेरण्यांना वेग येणार असल्याची शक्यता असतांना पुन्हा पावसाच्या सावटाखाली रब्बी हंगाम शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय बनला आहे.

- Advertisement -

चालू पावसाळ्यात जिल्ह्यात सततचा पाऊस आणि त्यानंतर सप्टेंबर महिन्यांत झालेल्या अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात खरीप हंगामातील सोयाबीन, कपाशी, तूर, ज्वारी, कांदा या पिकांसोबत कडधान्य, चारा पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. हातातोंडाशी आलेल्या खरीप पिकांचे उत्पादन पाण्यात बुडाल्याच्या परिस्थितीत आता रब्बी हंगामातील पेरणीची तयारी शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील काही भागांत सद्यःस्थितीत रब्बी पेरणीला सुरुवात झाली आहे, तर काही भागातील शेतकऱ्यांना वाफशाची प्रतिक्षा आहे.

जिल्ह्याच्या दक्षिणेतील तालुक्यात ज्वारीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असते. मात्र, गतवर्षापासून या तालुक्यात सरासरीहून अधिक पाऊस पडत असल्याने यंदा ज्वारीचे क्षेत्र घटण्याची शक्यता आहे. तर ऊस, गहू, हरभरा आणि मका पिकांचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज आहे. जिल्ह्यात कृषी विभागाने ३ लाख २० हजार ४६२ हेक्टर क्षेत्रावर नवीन ऊसाची लागवड होण्याचा अंदाज बांधला आहे.

५१ हजार हेक्टर पेरणी

जिल्ह्यात १ लाख ८२ हजार ४९६ हेक्टरवर ज्वारीची पेरणी होण्याचा अंदाज असून आतपर्यंत १५ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. तर मक्याचे ५०० हेक्टर, इतर तृणधान्ये १० हेक्टर, तेलबीया २० हेक्टर, हरभरा १०० हेक्टरवर पेरणी तर ऊसाचे ३५ हजार हेक्टरवर लागवड झाली आहे. गेल्या मंगळवारपासून दिवाळीच्या सुट्ट्या असल्याने जिल्ह्यातील पेरण्यांचा आकडा हा ५१ हजार हेक्टरपर्यंत गेला असल्याचा अदांज कृषी विभागाच्या सुत्रांनी व्यक्त केला.

गव्हासाठी थंडीची प्रतिक्षा

१ ते १५ नोव्हेंबर दरम्यान गव्हाची पेरणी अपेक्षित आहे. परंतु सप्टेंबर महिन्यांत अतिवृष्टी झाल्यानंतर ऑक्टोबरमध्ये देखील परतीचा पाऊस पडतो आहे. त्यामुळे गव्हाच्या पेरणीला आवश्यक असलेली थंडी पडलेली नाही. चांगली थंडी सुरु झाल्यानंतरच गव्हाच्या पेरणीला वेग येणार आहे.

ताज्या बातम्या

महायुती

State Cabinet Meeting: साताऱ्यात आय टी पार्कला जमीन, शिक्षकांना विद्यापीठ अनुदान;...

0
मुंबई | Mumbaiमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (22 एप्रिल) राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली. राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी पार पडलेल्या बैठकीत अनेक महत्त्वाचे...