वॉशिंग्टन । Washington
अमेरिका आणि इराण यांच्यातील काही काळासाठी थांबलेले युद्ध पुन्हा एकदा भडकण्याची चिन्हे आहेत. युद्धबंदीनंतर दोन्ही देशांमध्ये सुरू झालेली शांतता चर्चा निष्फळ ठरल्याने हा तणाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या सल्लागारांनी इराणवर लष्करी हल्ले पुन्हा सुरू करण्याचा आणि जगातील अत्यंत महत्त्वाचा सागरी मार्ग मानली जाणारी ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ रोखण्याचा गांभीर्याने विचार सुरू केला आहे. होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली न केल्यास इराणसह इतर देशांच्या जहाजांचीही नाकेबंदी करण्याचा कडक इशारा अमेरिकेने दिला आहे.
अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने (CENTCOM) अधिकृतपणे जाहीर केले आहे की, १३ एप्रिल रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:३० वाजता इराणच्या बोटींची आणि बंदरांची नाकेबंदी करण्यास सुरुवात केली जाईल. ही नाकेबंदी केवळ इराणपुरती मर्यादित नसून, इराणच्या बंदरांमध्ये आणि किनारी भागांत येणाऱ्या-जाणाऱ्या सर्व देशांच्या जहाजांवर सरसकट लागू केली जाणार आहे. राष्ट्राध्यक्षांच्या आदेशानुसार, अमेरिकन सैन्य इराणच्या सागरी वाहतुकीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवणार असून, यामध्ये अरबी आखात आणि ओमानच्या आखातातील सुविधांचाही समावेश असेल.
CENTCOM ने स्पष्ट केले आहे की, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून इराणव्यतिरिक्त इतर बंदरांकडे जाणाऱ्या जहाजांच्या प्रवासात कोणताही अडथळा आणला जाणार नाही. मात्र, या भागात कार्यरत असलेल्या व्यावसायिक खलाशांना अधिकृत ‘माहिती प्रसारणांवर’ लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, सुरक्षिततेसाठी अमेरिकी नौदल दलांशी ‘ब्रिज-टू-ब्रिज चॅनल १६’ वर संपर्क साधण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ओमानच्या आखातात तणाव वाढल्याने व्यापारी जहाजांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वर एका पोस्टद्वारे या कारवाईची पुष्टी केली. विशेषतः ‘बेकायदेशीर टोल’ भरणाऱ्या जहाजांवर अमेरिकेचे विशेष लक्ष असणार आहे. अमेरिकेच्या या आक्रमक भूमिकेमागे केवळ लष्करी कारणे नसून आर्थिक हितसंबंधही दडलेले आहेत. आखातातील सामरिक मार्गावरून जाणाऱ्या काही जहाजांकडून कच्च्या तेलाच्या व्यापारासाठी चिनी चलनाची (युआन) कथित प्रथा सुरू झाली आहे. याला आळा घालणे हा अमेरिकेचा मुख्य उद्देश असल्याचे मानले जाते.
ही घडामोडी जागतिक अर्थव्यवस्थेवर राज्य करणाऱ्या ‘पेट्रोडॉलर’ प्रणालीला दिलेले आव्हान आणि अमेरिकेचे निर्बंध टाळण्याचा प्रयत्न म्हणून पाहिली जात आहे. चीन आणि इराण या दोन्ही देशांविरुद्ध अमेरिकेने आपली भूमिका कठोर केली असून, आर्थिक दबावाला न जुमानणाऱ्या या दोन देशांसोबतचा तणाव आता टोकाला पोहोचला आहे. या नाकेबंदीमुळे जागतिक स्तरावर इंधन पुरवठ्यावर आणि तेलाच्या किमतींवर काय परिणाम होतो, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.




