मुंबई | Mumbai
अमेरिका, इस्रायल वि. इराणमधील युद्ध थांबायचे नाव घेत नाहीये. त्यामुळे हे युद्ध नेमके किती दिवस चालणार? याचे नेमके किती आणि काय परिणाम भारताला भोगावे लागणार याबाबत कोणीही स्पष्टपणे सांगू शकणार नाही. परंतु, या युद्धाच्या झळा आता भारताला बसण्यास सुरुवात झाली आहे. युद्ध अजून जास्तकाळ सुरु राहिलंच तर त्याचा परिणाम शेतमालाच्या निर्यातीवर तर होणारच आहे. मात्र, इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतल्यानं ऊर्जा क्षेत्रापुढं नवी समस्या निर्माण झाली आहे. भारतातील घरगुती गॅस सिलिंडर आणि व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. ज्यामुळे या दोन्ही सिलिंडरच्या किंमती वाढल्या असून हे नवे दर आज शनिवारपासून (ता. 7 मार्च) लागू करण्यात आले आहेत.
LPGच्या किमतीत वाढ
मध्य पूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस तुटवड्याची शक्यता लक्षात घेत सरकारने दरवाढ केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार घरगुती सिलिंडरच्या किंमतीत ६० रुपयांनी आणि व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत ११५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यामुळे देशभरातील सामान्य नागरिकांना मोठा फटका बसणार असून हॉटेलिंग, बाहरेचे खाणे-पिणे हेही महाग शकते.
भारत जगातील दुसरा सर्वात मोठा LPG आयात करणारा देश
गेल्या आठ दिवसांपासून आखाती देशांत सुरू असलेल्या संघर्षामुळे संपुर्ण जगभरात ऊर्जा संकट ओढावण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या युद्धाचा परिणाम एलपीजी पुरवठ्यावर म्हणजेच लिक्विफाईड पेट्रोलियम गॅसवर होण्याची शक्यता आहे. कारण, भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा LPG आयात करणारा देश आहे. गेल्या वर्षी देशात जवळपास 33.15 दशलक्ष मॅट्रिक टन घरगुती गॅसचा वापर झाला. LPG प्रोपेन आणि ब्यूटेन गॅसच्या माध्यमातून तयार होतो. देशाच्या एकूण LPG गरजेच्या जवळपास दोन तृतियांश वाटा आयात करतो.
सरकारी आदेशानुसार सर्व तेल शुद्धीकरण कारखान्यांनी एलपीजी उत्पादनासाठी त्यांच्या उपलब्ध प्रोपेन आणि ब्युटेनचा शक्य तितका वापर करावा. घरांना सतत पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी उत्पादकांना सरकारी मालकीच्या रिफायनरीजना एलपीजी, प्रोपेन आणि ब्युटेन पुरवण्यास सांगितले आहे.
या कंपन्यांना तेल पुरवठा केला जाईल
सरकारने असे म्हटले आहे की गॅस प्रामुख्याने सरकारी मालकीच्या तेल कंपन्या, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन यांना पुरवला जावा, जे नंतर तो घरगुती ग्राहकांना वितरित करतील. सरकारी आकडेवारीनुसार, देशात अंदाजे 332 दशलक्ष सक्रिय एलपीजी ग्राहक आहेत. अमेरिकेतून भारतात एलपीजीची आयात जानेवारीमध्ये सुरू झाली. नोव्हेंबर 2025 मध्ये, भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी 2026 च्या करार वर्षासाठी अमेरिकेच्या गल्फ कोस्टमधून दरवर्षी अंदाजे 2.2 मेट्रिक टन एलपीजी आयात करण्यासाठी एक वर्षाचा करार केला.
१४.२ किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ६० रुपयांची वाढ झाल्याने आता नाशिकमध्ये या सिलेंडरचा दर ८५६.५० वरुन ९१६.५० रुपये इतका झाला आहे तसेच मुंबईत या सिलिंडरचा दर ८५२.५० रुपयांवरून ९१२.५० रुपयांवर गेला आहे. तर दिल्लीत हा दर ८५३ रुपयांवरून ९१३ रुपये झाला आहे. तर १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात ११५ रुपयांची दरवाढ करण्यात आल्याने मुंबईत व्यावसायिक सिलिंडर १८८३ रुपयांना मिळणार आहे. दिल्लीत या सिलिंडरचे दर १८३५ रुपये झाले आहेत. एप्रिल 2025 नंतर पहिल्यांदाच गॅसच्या किमतीत इतकी मोठी वाढ झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून स्थिर असलेल्या गॅसच्या किमती अचानक वाढल्याने गृहिणींचे बजेट कोलमडणार आहे.
मध्य-पूर्वेतील संकटाने सध्या पुरवठा कमी झाला असला तरी ग्राहकांनी चिंता करू नये, लवकरच पर्यायी मार्गाने गॅसचा पुरवठा होईल असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.
देशदूतच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉइन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




