नाशिक| जिमाका वृत्तसेवा Nashik
प्रत्येक शेतकरी, शेतमजुराचे उत्पन वाढविण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. शेतीतील उत्पन्न आणि उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करावा. तंत्रज्ञानाचा वापर हाच शेतकऱ्यांचा समृद्धीचा मार्ग आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.
जिल्हा विकास आराखडा नाशिक फेस्टिव्हल अंतर्गत जिल्हा प्रशासन, जिल्हा नियोजन समिती, कृषी विभाग, ‘आत्मा’ आणि माविमच्या संयुक्त विद्यमाने ‘कृषी कुंभ -2026’ चे आयोजन आजपासून यूथ फेस्टिवल मैदानावर सुरू झाले. त्याच्या उद्घाटप्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद बोलत होते. कृषी कुंभचे उद्घाटन राज्य शासनाचे ‘कृषी पुरस्कार’ प्राप्त महिला शेतकऱ्यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण (मालेगाव), हेमांगी पाटील (नाशिक), द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर, विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक अभिमन्यू काशिद, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, कृषी पुरस्कार प्राप्त महिला शेतकरी मेधा बोरसे, विमलताई आचारी, सुनीता खेमनार, श्रद्धा कासार्डे, संगीता सांगळे, पूनम डोखळे, लक्ष्मी मोरे आदी उपस्थित होते.तत्पूर्वी महापौर हिमगौरी आहेर-आडके, उपमहापौर विलास शिंदे यांनीही कृषीकुंभ प्रदर्शनास भेट देऊन पाहणी केली.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती व्हावी म्हणून कृषी कुंभचे आयोजन करण्यात आले आहे. या कृषी कुंभात जिल्ह्यातील प्रत्येक गावातील शेतकरी भेट देतील, असे नियोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यासाठी काश्मीरपासून ते केरळपर्यंतच्या भागातील प्रगतीशील शेतकरी, तज्ज्ञांना निमंत्रित करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी कृषी कुंभमध्ये मिळालेली माहिती आपापल्या गावातील शेतकऱ्यांना द्यावी. तसे झाल्यास कृषी कुंभमध्ये मिळालेल्या माहितीचे सकारात्मक परिणाम आगामी खरीप हंगामात दिसून येण्यास मदत होईल.
कृषी कुंभमध्ये कृषी विभागाशी निगडित एकूण १६ विभागांचे सुमारे चारशेवर स्टॉल मांडण्यात आले आहे. यामध्ये शेतकऱ्यांना अद्ययावत माहिती उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. शेतकऱ्यांनी लागवड, मशागत, मळणीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञान उपलब्ध आहे. त्याचीही माहिती घेत शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञनाचा वापर करावा, असेही आवाहन जिल्हाधिकारी प्रसाद यांनी केले.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी माने यांनी प्रास्ताविकात महोत्सवाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, संयुक्त राष्ट्र संघाने यंदाचे वर्ष हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष घोषित केले आहे. त्यामुळे कृषी कुंभचे उदघाटन जिल्ह्यातील कृषी पुरस्कार प्राप्त महिला शेतकऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शेतकरी, कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रदर्शनात विविध उपक्रम
या प्रदर्शनात शेतीमधील आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित विविध दालने उभारण्यात आली आहेत. ड्रोन तंत्रज्ञान, ‘फसल’ व ‘फायलो’ कंपनीचे स्मार्ट सेन्सर, इलेक्ट्रिक बुल तसेच कांदा चाळीसाठी सेन्सर आधारित यंत्रणेची माहिती देणारे स्टॉल. यांत्रिकीकरण विभागात ३० पेक्षा अधिक स्टॉल, तर शासकीय योजनांची माहिती एकाच छताखाली या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणार आहे. या प्रदर्शनात १३ मार्च रोजी द्राक्ष शेतीचा नवा मंत्र व निर्यात क्षमता (पंकज नाठे, अनंत मोरे), १४ मार्च रोजी डाळिंब शेती व मधमाशी पालन (तुकाराम निकम, सोमनाथ गांगुर्डे), १५ मार्च रोजी कांदा पिकाचे आधुनिक व्यवस्थापन (डॉ. राजीव काळे, डॉ. तुषार आमरे) याविषयावर, तर १६ मार्च रोजी कृषी क्षेत्रातील एआयचा वापर (गटचर्चा) याविषयावर चर्चा करण्यात येणार आहे. याशिवाय कृषी कुंभमध्ये रोज सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून १४ मार्च रोजी ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ आणि १५ मार्च रोजी ‘फोकलोक’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय नाशिककरांसाठी विशेष ‘खाऊ गल्ली’ उपलब्ध असून मिसळ, मांडे, पुरणपोळी, धपाटे आणि थालीपीठ यासारख्या पारंपरिक खाद्यपदार्थांची मेजवानी उपलब्ध आहे. तसेच या प्रदर्शनात धान्य विक्रीचेही स्टॉल आहेत. ग्राहकांनी या स्टॉलचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.




