Monday, October 12, 2026
HomeमनोरंजनMadhu Kambikar Death: ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांचं निधन, ७३ व्या वर्षी...

Madhu Kambikar Death: ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांचं निधन, ७३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पुणे | Pune

मराठी लोककला, रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीवर आपल्या अस्सल लावणीने आणि कसदार अभिनयाने तब्बल चार दशकांहून अधिक काळ राज्य करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री तथा लावणी सम्राज्ञी मधू कांबीकर यांचे पुण्यात निधन झाले आहे. त्या ७३ वर्षांच्या होत्या. गेल्या काही काळापासून त्या दीर्घ आजाराने ग्रस्त होत्या आणि अंथरुणाला खिळून होत्या. त्यांच्या निधनाने मराठी मनोरंजनविश्वावर आणि लावणी जगतावर मोठी शोककळा पसरली आहे. एका युगाचा अंत झाल्याची भावना लावणीप्रेमी आणि कलाकारांकडून व्यक्त होत आहे.

- Advertisement -

मधू कांबीकर यांचा जन्म २८ जुलै १९५३ रोजी बीड जिल्ह्यातील माळेगाव खुर्द येथे एका अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत झाला. परंतु, या परिस्थितीवर मात करत त्यांनी कलेची कास धरली. कथ्थक नृत्याचे कसदार प्रशिक्षण घेतल्यानंतर, १९७३ मध्ये मुंबईतील लालबाग येथील ‘न्यू हनुमान थिएटर’ मधून त्यांच्या गौरवशाली कलाप्रवासाला सुरुवात झाली. रंगमंचावर लावणी सादर करत असतानाच एके दिवशी अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना पक्षाघाताचा झटका आला होता, त्यानंतर त्या कलाविश्वातून हळूहळू दूर गेल्या. परंतु, त्यांनी रसिकांच्या मनावर सोडलेला ठसा आजही कायम आहे.

फक्त लावणीच नव्हे, तर मराठी चित्रपटसृष्टीत आणि लोकनाट्यातही त्यांनी आपल्या अफाट अभिनयाची चुणूक दाखवली. ‘सतीची पुण्याई’, ‘शापित’, ‘हेच माझं माहेर’, ‘ह्योच नवरा पाह्यजे’, ‘झपाटलेला’, ‘एक होता विदूषक’ आणि ‘रावसाहेब’ यांसारख्या अजरामर चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. त्यांनी काही हिंदी चित्रपटांतही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. १९७७ मध्ये ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या प्रतिष्ठित कलापथकाच्या माध्यमातून त्यांनी थेट दिल्लीत जाऊन आपले अप्रतिम नृत्यनाट्य सादर केले होते. त्यांच्या लावणीतील सहजसुंदर अदा, चेहऱ्यावरचे भाव आणि लयबद्धता यामुळे त्यांना महाराष्ट्रच नव्हे, तर देशाबाहेरही मोठी ओळख मिळाली.

‘शापित’, ‘हेच माझं माहेर’ आणि ‘राघू मैना’ यांसारख्या चित्रपटांमधील उत्कृष्ट अभिनयासाठी त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. ‘सखी माझी लावणी’ या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी लावणीची अस्सल परंपरा केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर अमेरिका, दुबई, अबू धाबी आणि मॉरिशस यांसारख्या देशांत पोहोचवली. लावणीचे जतन व्हावे म्हणून त्यांनी अनेक नवोदित कलाकारांना मोलाचे प्रशिक्षणही दिले. त्यांच्या निधनाने ग्रामीण महाराष्ट्रातील लोककलेला व्यापक ओळख मिळवून देणारी एक बुलंद व मोहक कलाकारा हरपली आहे. त्यांच्या जाण्याने मराठी रंगभूमीचे आणि लावणी विश्वाचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे.

ताज्या बातम्या