मनमाड । बब्बू शेख Manmad
वेगवेगळी संकटे शेतकर्यांचा पिच्छा सोडायला तयार नसताना आता त्यांच्यासमोर पशुवैद्यकीय अधिकार्यांच्या कमतरतेचे Lack of veterinary officers नवीन संकट उभे ठाकले आहे. मनमाडसह नांदगाव तालुक्यात Nandgaon Taluka पशुवैद्यकीय अधिकार्यांच्या सर्व 10 जागा रिक्त असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. डॉक्टरांअभावी पशुधन धोक्यात आले असून वेळेवर उपचार मिळत नसल्यामुळे अनेक जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. त्यामुळे शासनाने पशुवैद्यकीय अधिकार्यांच्या रिक्त जागा तातडीने भराव्यात, अशी मागणी होत आहे.
गेल्या काही वर्षांपासून पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळ्याचे वेळापत्रकच कोलमडले आहे. कधीही पाऊस होतो. हिवाळ्यात कडक उन्हाचे चटके बसतात. या बदलत्या हवामानाचा सर्वाधिक फटका हा शेतीला बसत आहे. शेती निसर्गावर अवलंबून आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती बेभरवशाची झाली आहे. अनेक शेतकरी जोडधंदा म्हणून पशुपालन आणि दुग्धव्यवसाय करू लागले आहेत. त्यांनी गायी, म्हशी, शेळी, मेंढीपालन सुरू केले आहे. पशुपालन आणि दुग्धव्यवसायासाठी शासनाने अनेक योजनादेखील सुरू केल्या आहेत.
त्यातील काही योजना पशुवैद्यकीय विभागामार्फत राबवल्या जातात. जनावरांना रोगांची लागण होऊ नये, त्यांना वेळेवर उपचार मिळावेत यासाठी शासनाने ठिकठिकाणी पशुवैद्यकीय दवाखाने सुरू केले आहेत. मनमाडसह नांदगाव तालुक्यात श्रेणी एकचे 9 आणि श्रेणी दोनचे 9 असे एकूण 18 दवाखाने असून त्यासाठी 10 पशुवैद्यकीय अधिकार्यांची मंजुरी आहे. मात्र गेल्या दोन वर्षांपासून येथे एकही डॉक्टर नाही. सर्व जागा रिक्त असल्यामुळे जनावरांचे लसीकरण होत नाही. जनावर आजारी पडल्यास खासगी डॉक्टरांना बोलवावे लागते. ते मनमानी पद्धतीने शुल्क घेतात, असा आरोप पशुपालक शेतकर्यांनी केला आहे.
दर पाच वर्षांनी पशूंची गणना केली जाते. मात्र नांदगाव तालुक्यात 2001 नंतर पशुगणना झालेली नाही. त्यामुळे आता किती पशुधन आहे, याची निश्चित माहिती नाही. शासनाने तातडीने रिक्त असलेल्या पशुवैद्यकीय अधिकार्यांच्या जागा भरून दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे. केवळ मनमाड, नांदगाव तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण नाशिक जिल्ह्यात पशुवैद्यकीय अधिकार्यांच्या जागा रिक्त असल्याचे विदारक चित्र आहे.
नाशिक जिल्ह्यात श्रेणी एकचे 108 व श्रेणी दोनचे 133 असे एकूण 266 पशुवैद्यकीय दवाखाने असून त्यासाठी पशुवैद्यकीय अधिकार्यांची एकूण पदे 94 मंजूर आहेत. त्यात 49 पदे रिक्त आहेत. जिल्ह्यात गायी 10 लाख 10 हजार 5, म्हशी 2 लाख 71 हजार 395, शेळ्या 3 लाख 50 हजार 783 व मेंढ्या 5 लाख 33 हजार 68 इतके पशुधन आहे. ही आकडेवारी सन 2001 ची असून गेल्या 20 वर्षांपासून पशुधन गणना झालेली नसल्याचा आरोप शेतकर्यांनी केला आहे.
नांदगाव मतदारसंघात पशुवैद्यकीय अधिकार्यांच्या सर्व जागा रिक्त आहेत, ही वस्तुस्थिती आहे. या जागा भराव्यात यासाठी मी पशुसंवर्धनमंत्र्यांकडे निवेदन दिले आहे. इतर अधिकार्यांना देखील पत्र पाठवले असून आगामी नागपूर अधिवेशनात शेतकर्यांच्या या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आवाज उठवणार आहे.
आ. सुहास कांदे MLA Suhas Kande




