Thursday, October 1, 2026
Homeराजकीयविधान परिषद उपसभापती निवडणूक : नीलम गोऱ्हेंना पुन्हा संधी की शिंदेंचं नवं...

विधान परिषद उपसभापती निवडणूक : नीलम गोऱ्हेंना पुन्हा संधी की शिंदेंचं नवं ‘धक्कातंत्र’?

मुंबई । Mumbai

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान आता सर्वांचे डोळे विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीकडे लागले आहेत. सभापती राम शिंदे यांनी काल (२९ जून) सभागृहात या निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार येत्या १ जुलै २०२६ रोजी दुपारी १ वाजता ही निवडणूक पार पडणार आहे. महायुतीमध्ये भाजपची सदस्यसंख्या सर्वाधिक असली, तरीही उपसभापती पद शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या वाट्याला गेलं आहे. मात्र, सध्या या पदासाठी शिंदेंच्या शिवसेनेत अंतर्गत पातळीवर कमालीची चुरस आणि रस्सीखेच पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

माजी उपसभापती नीलम गोऱ्हे या अनुभवी आणि प्रबळ दावेदार मानल्या जात असल्या, तरी एकनाथ शिंदे यंदा या निवडणुकीत मोठं ‘सरप्राईज’ देण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. आज सकाळीच वर्षा बंगल्यावर या संदर्भात एक महत्त्वाची बैठक होणार असून, त्यात अंतिम नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. सध्या शिवसेनेत प्रामुख्याने दोन नेत्यांमध्ये मोठी चुरस रंगली आहे.

उत्तर महाराष्ट्रातील आमदारांची आक्रमक मागणी धुळ्याचे वजनदार नेते चंद्रकांत रघुवंशी आणि माजी खासदार कृपाल तुमाने यांच्यात सध्या उपसभापती पदावरून थेट चढाओढ सुरू आहे. चंद्रकांत रघुवंशी यांना हे पद मिळावं यासाठी उत्तर महाराष्ट्रातील तब्बल ९ आमदारांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून आपली मागणी नोंदवली आहे.

यामध्ये अमोल पाटील, गोकुळ गिते, सत्यजीत तांबे, आमशा पाडवी, किशोर पाटील, चंद्रकांत सोनावणे, चंद्रकांत पाटील, मंजुळा गावित आणि तुळशीराम गावित यांचा समावेश आहे. मात्र, उपमुख्यमंत्री शिंदेंचा पूर्वेतिहास पाहता, ते नेहमीच ऐनवेळी धक्कातंत्र वापरण्यासाठी ओळखले जातात. त्यामुळे या दोन नावांव्यतिरिक्त एखादा अनपेक्षित चेहरा समोर आला तरी आश्चर्य वाटायला नको.

नीलम गोऱ्हे यांचा कार्यकाळ संपल्यानंतर हे पद रिक्त झालं होतं. नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत त्या शिवसेना शिंदे गटाकडून बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यांचा प्रदीर्घ संसदीय अनुभव पाहता पुन्हा एकदा त्यांच्याच गळ्यात उपसभापतीपदाची माळ पडेल, अशीही शक्यता वर्तवली जात आहे. परंतु, पक्षांतर्गत चर्चेत कृपाल तुमाने आणि चंद्रकांत रघुवंशी यांच्यासोबतच मनीषा कायंदे यांचंही नाव पुढे आल्याने सस्पेन्स आणखी वाढला आहे.

दुसरीकडे, विधान परिषदेत सध्या विरोधी पक्ष असलेल्या महाविकास आघाडीकडे (MVA) विजयासाठी आवश्यक असणारे संख्याबळ दिसत नाही. अशा परिस्थितीत महाविकास आघाडी आपला उमेदवार रिंगणात उतरवून केवळ औपचारिकता पूर्ण करणार, की सत्ताधाऱ्यांशी चर्चा करून ही निवडणूक बिनविरोध पार पडू देणार, याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे. उमेदवारी अर्ज भरणे, त्यांची छाननी, अर्ज मागे घेणे आणि त्यानंतर आवश्यक असल्यास १ जुलैलाच मतदान व निकाल जाहीर केला जाईल. अंतिम क्षणापर्यंत रंगणाऱ्या या राजकीय घडामोडींमुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.

ताज्या बातम्या

Nashik News : शिक्षक नेते प्रकाश सोनवणे यांची गळफास घेऊन आत्महत्या;...

0
नाशिक | Nashik नाशिक डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर्स सोसायटीचे (एनडीएसटी) माजी चेअरमन तथा ज्येष्ठ शिक्षक नेते प्रकाश लीला सोनवणे (वय ६५) (Prakash Sonawane ) यांनी बुधवारी...