मुंबई | Mumbai
शिवसेना ठाकरे गटाचे मुंबईतील नेते आणि विधानपरिषदेचे आमदार सचिन अहिर यांना मंगळवारी शिंदे गटाकडून विधानपरिषदेच्या उपसभापतीपदाचा अर्ज भरुन उध्दव ठाकरे गटासह राजकीय वर्तुळाला मोठा धक्का दिला. सचिन अहिर (Sachin Ahir) मंगळवारी सकाळी निवडणूक अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज भरायला पोहोचले तेव्हा ते शिंदे गटात गेल्याचा उलगडा सगळ्यांना झाला. आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय समजल्या जाणारे सचिन अहिर यांच्या या निर्णयाने शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचे म्हटले जाते. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सचिन अहिर यांच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना जोरदार टीकास्त्र सोडले.
ज्यांना पक्षाने सगळं काही दिलं, तेच लोक आज…
आदित्य ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे अहिर थेट शिंदे गटात गेल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या सर्व घडामोडींवर आमदार आदित्य ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “ज्यांना पक्षाने सगळं काही दिलं, तेच लोक आज साथ सोडून जात आहेत, पण हा आम्हाला धक्का नाही,” अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी आपला संताप व्यक्त केला.
सचिन अहिर यांच्या पक्षांतरावर बोलताना आदित्य ठाकरे यांनी त्यांना शिवसेनेत मिळालेल्या पदांची आणि सत्तेची जंत्रीच वाचून दाखवली. आदित्य ठाकरे म्हणाले, “सचिन अहिर यांना पक्षाने भरभरून दिलं. त्यांना शिवसेना उपनेते पद दिलं, भारतीय कामगार सेना आणि ‘बेस्ट’ कामगार सेनेची मोठी जबाबदारी दिली. एवढंच नाही, तर त्यांच्या कुटुंबालाही झुकतं माप दिलं असल्याचं त्यांनी म्हटले. त्यांच्या बंधूला ‘बेस्ट’ समितीवर स्थान दिलं, तर त्यांच्या मुलीला स्वयंसेवी संस्थेच्या कोट्यातून प्रभाग समितीवर संधी दिली. पक्षाने एवढं सगळं दिल्यानंतर त्यांना अजून काय हवं होतं?”, असा सवाल आदित्य यांनी केला.
आम्ही रोज तुमच्या आरत्या करायच्या का?
आमदार सेनेत पद आहे, शिवसेनेत उपनेतेपद आहे. अजून तुम्हाला काय पाहिजे असा प्रश्न पडत आहे? आम्ही यांना काही कमी दिलेले नाही, आम्ही रोज तुमच्या आरत्या करायच्या का? असा सवाल करत कोणी जाण्याने काही फरक पडत नाही, असे म्हणत आदित्य ठाकरेंनी सचिन अहिरांना खडेबोल सुनावले आहेत.
हे ऑपरेशन टायगर नाही
तसेच, हे ऑपरेशन टायगर मुळीच नाही. हे ऑपरेशन देवेंद्र फडणवीस आहे. हे अभ्यासातून लक्षात आले आहे. हे ऑपरेशन फडणवीस आहे. हे लक्षात आले आहे. सकाळी त्यांनी मेसेज पाठवला वरळीतून उभा राहणार नाही. हे म्हणण्याच्या गोष्टी आहेत. उभे राहिले तरी काही फरक पडत नाही. भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि संघाच्या कार्यकर्त्यांना सवाल आहे, आज उपसभापती डोक्यावर बसला. तुमच्यातील का नाही बसला. हा भाजपने विचार केला पाहिजे. हे ऑपरेशन फडणवीस आहे, असेही यावेळी आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे.




