रांजणगाव देशमुख |वार्ताहर|Ranjangaon Deshmukh
मुंबई येथील विधान भवन येथे गुरुवारी युवा नेते विवेक कोल्हे यांनी विधान परिषदेच्या सदस्यपदाची सभापती प्रा राम शिंदे यांच्याकडुन शपथ घेतली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांचेसह अनेक मंत्री उपस्थित होते. या शपथविधीनंतर कोपरगाव मतदारसंघात जल्लोष साजरा करण्यात आला. हजारो कार्यकर्त्यांनी शपथविधी सोहळ्याचे थेट प्रक्षेपण पाहत ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि खर्या विकासाला आपला विवेक पाहिजे अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून सोडला.
शपथविधीनंतर आ. विवेक कोल्हे म्हणाले, पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या आदेशानुसार विधानसभा निवडणुकीवेळी युतीधर्म पाळत थांबावे लागले होते. त्या निष्ठेची दखल घेत भाजप कोअर कमिटीने मला विधानपरिषदेवर काम करण्याची संधी दिली. मी शिर्डीच्या साईबाबांच्या भूमीतून आलो आहे. त्यामुळे श्रद्धा आणि सबुरीचे फळ मला मिळाले, असे मी मानतो. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच भाजपच्या कोअर कमिटीचे आभार मानले.
आ. कोल्हे म्हणाले, सहकार, ग्रामीण आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि युवकांचे प्रश्न विधान परिषदेत प्रभावीपणे मांडण्याचा निर्धार व्यक्त करताना त्यांनी विकासाभिमुख आणि सकारात्मक राजकारणावर भर देणार असल्याचे स्पष्ट केले. पश्चिमेकडील पाणी पूर्वेकडे वळविण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला प्राधान्य देणार असल्याचे सांगत त्यांनी अहिल्यानगर, नाशिक आणि मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
दरम्यान शपथविधी सोहळ्यात विवेक कोल्हे यांच्या व्यक्तिमत्त्वाची आणि कार्यशैलीची विशेष चर्चा रंगली. भाजपने दिलेल्या सर्वाधिक तरुण चेहर्यांपैकी एक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असून कमी वयात घेतलेले धाडसी राजकीय निर्णय, अभ्यासू वृत्ती आणि दूरदृष्टीमुळे त्यांचे कौतुक होत असल्याचे दिसून आले.
शपथविधीनंतर माध्यमांशी संवाद साधताना विवेक कोल्हे यांनी परिधान केलेली पांढरी गांधी टोपी चर्चेचा विषय ठरली. महाराष्ट्रातील शेतकरी, वारकरी आणि कष्टकरी समाजाचे प्रतीक असलेल्या या टोपीतून त्यांनी स्व. शंकरराव कोल्हे यांच्या कार्याला अभिवादन केले. स्व. शंकरराव कोल्हे यांनी आयुष्यभर सूट-बुटाचा त्याग करून धोतर आणि पांढरी टोपी परिधान करत शेतकरी व सहकार क्षेत्रासाठी कार्य केले होते. त्याच परंपरेचे स्मरण विवेक कोल्हे यांनी या माध्यमातून घडवून आणले.




