शहादा | ता. प्र.
तालुक्यातील असलोद गावात अवैध दारू विक्री बंदीसह बियर बार आणि शॉपीचा परवाना रद्द करण्यासाठी प्रशासनाने घेतलेल्या ‘आडवी बाटली’ व ‘उभी बाटली’ वर महिलांनी मतदान प्रक्रिया राबविली. त्यात ‘आडव्या बाटली’ने प्रचंड विजय मिळवला. त्यामुळे शासनाला संपूर्ण दारूबंदी करणे भाग पडणार आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहादा तालुक्यातील असलोद आणि परिसरात अनेक वर्षापासून अवैध दारू विक्री सुरू आहे. तसेच गावाजवळच मुख्य रस्त्यावर बियर बार आणि शॉपी सुरू आहे. त्यामुळे गावातील महिलांसह ग्रामस्थांनी गाव आणि परिसरात अवैध दारू विक्री कायमस्वरुपी बंद होण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. अखेर जिल्हा प्रशासनाने दारूबंदीसाठी ‘आडवी बाटली’ आणि ‘उभी बाटली’ वर गावातील महिलांसाठी मतदान प्रक्रिया राबविली.
एकूण १ हजार २०० महिला मतदारांसाठी तीन बूथ निश्चित करण्यात आले होते. या मतदान प्रक्रियेत एकूण ६७७ महिलांनी मतदान केले. त्यात आडव्या बाटलीला तब्बल ६१२ मते मिळाली. बॅलेट पेपरवर ही मतदान प्रक्रिया तहसिलदार दिपक गिरासे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. उपविभागीय पोलिस अधिकारी दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राजन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. आडव्या बाटलीने विजय मिळाल्याने गावात सर्वत्र आनंदोत्सव साजरा करण्यात आला.