राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
येळकोट येळकोट जयमल्हारच्या निनादात श्रीश्रेत्र वाकडी येथील खंडोबा देवाची चंपाशष्टी यात्रा मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने साजरी झाली. यात्रेच्या तीन दिवसात सुमारे दिड लाख भाविकांनी हजेरी लावत खंडेरायाचे दर्शन घेतले. शनिवारी चंपाषष्टीच्या दिवशी महाराष्ट्रातून दोन लाख भाविकांनी दर्शन घेतले. राज्यातील भाविकांचे कुलदैवत असलेल्या खंडोबा देवाच्या दर्शनासाठी भाविकांनी सकाळ पासूनच मोठी गर्दी केली होती. चंपाषष्टीच्या अगोदर भाविक नवरात्राचे पाच दिवस उपवास करून सहाव्या दिवशी कांदा वांगे खंडोबाला वाहून उपवास सोडला जातो. तसेच चंपाषष्ठी या दिवशी वांग्याचे भरीत आणि भाकरी यांचा नैवेद्य करून देवाला दाखविला जातो. खंडोबाची तळी भरून आरती केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी पूजा केल्याने सर्व दुःख दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात, असे खंडोबा मंदिर चे ट्रस्टी यांनी सांगितले.
चंपाषष्टी निमित्ताने खंडोबा मंदिर परिसरात भंडार्याची मुक्त उधळण आणि खोबर्याचा पटारा करत वाघे मंडळींनी खंजिरी, तुणतुणेच्या तालबध्द संगीताने खंडेराया गाण्यांच्या स्वरांनी तळी भरली. वाकडी गावातून खंडोबा देवाची काठी मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत वाघे मंडळींनी खंडेरायाचे वर्णन करणारे गिते गात या मिरवणुकीला साज चढविला. या मिरवणुकीत भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. चंपाषष्टीच्या दिवशी पहाटे देवाची आरती करण्यात आली. तसेच दिवसभर भविकांची दर्शनासाठी मांदियाळी होती. खंडेराय देवस्थान ट्रस्टने दर्शन रांगा बनविल्याने भाविकांनी शिस्तबध्द दर्शन घेतले. देवाला कांदे वांगे, खोबरे, भंडारा, पान फुल वाहत लाखो भाविकांनी दर्शन घेतले.
देवाच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. देवाच्या मुखवट्याची ही मिरवूणक वाकडी गावात नेण्यात आली. यावेळी मिरवणुकी समोर देवाच्या अश्वाने ठेका धरला होता. या मिरवणुकीत या अश्वनृत्याने भाविकांचे लक्ष वेधले होते. चंपाषष्टी यात्रेत कांदे, वांगे वाहण्याचा प्रघात आहे. वाकडी पंचक्रोशी व आजुबाजुच्या तालुक्यातील भाविक, जुने मंडळी कांदा व वांगे विशेष करुन शेतात नवीन निघालेले ते चंपाषष्टी पर्यंत आहारात घेत नाहीत. त्याला नवं धरलं असे म्हणतात. देवाला चंपाषष्टी यात्रेत कांद,े वांगे वाहुन नवीन कांदे, वांगे आहारात घेण्यास सुरुवात करतात. हे कांदे, वांगे विक्रीसाठी चंपाषष्टीला विक्रेत्यांची मोठी गर्दी असते.