बीड । Beed
मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांची हत्या आणि पवनचक्की खंडणी प्रकरणामुळे वाल्मिक कराड हा चांगलाच अडचणीत सापडला आहे. अशातच आता कराडच्या अडचणीत मोठी भर पडली आहे. (Santosh Deshmukh Murder Case)
22 जानेवारी रोजी कराडला बीड विशेष न्यायालयाकडून 14 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती. पण आज या कोठडीची मुदत संपत आहे. अशातच कराडला आज कोर्टात हजर न करताच त्याच्या न्यायालयीन कोठडीत आणखी 14 दिवसांची वाढ केली आहे.
दरम्यान, आज बीड कारागृहाकडून जेल वॉरंट कोर्टाला पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर कराडच्या कोठडीत कोर्ट आणखी 14 दिवसांची वाढ करेन. याच कारणामुळे आज कराड किंवा त्याच्या वकिलाकडून कोणतीही सुनावणी होणार नाही. कोर्टाच्या या निर्णयामुळे कराडच्या अडचणीत भर पडली आहे.
सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder) यांची 9 डिसेंबरला केज तालुक्यात निर्घृणपणे हत्या झाली होती. वाल्मिक कराड याच्या सांगण्यावरुन ही हत्या झाली, असा आरोप झाला होता. देशमुख यांच्या हत्येनंतर तब्बल 24 दिवस वाल्मिक कराड फरार होता. पोलिसांनी त्याला शोधण्यासाठी अनेक पथके कामाला लावली होती. मात्र, तो पोलिसांच्या हाताला लागला नव्हता.
अखेर वाल्मिक कराड 31 डिसेंबरला पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण आला होता. यानंतर वाल्मिक कराडचा पोलीस कोठडी आणि न्यायालयीन कोठडी असा प्रवास सुरु झाला होता. यादरम्यान वाल्मिक कराड याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात मकोका लागल्याने त्याची इतक्यात तुरुंगातून सुटका होणे अवघड मानले जात आहे.