सिन्नर । प्रतिनिधी Sinnar
राज्य निवडणूक आयोगाने ( State Election Commission ) जाहिर केलेल्या कार्यक्रमानुसार सिन्नर नगर परिषदेच्या ( Sinnar Town Council ) प्रभाग ( Ward Structure ) रचनेचा प्रारुप आराखडा नुकताच जिल्हाधिकारी व मुख्याधिकार्यांच्या सहीने प्रसिध्द करण्यात आला. काल (दि. 11) यावर हरकती घेण्यासाठी नगर परिषदेत राजकीय पक्षांचे कार्यकर्ते व इच्छुकांनी गर्दी केल्याचे बघायला मिळाले. मात्र, मुख्याधिकार्यांच्या कार्यालयाला कुलुप लावलेले असल्याने या हरक ती कुणाकडे नोंदवायच्या याचीच माहिती मिळत नसल्याने अनेक इच्छूकांनी नाराजी व्यक्त केली.
नगर परिषदेत प्रभाग रचनेच्या प्रारुप आराखड्याच्या प्रती बोर्डवर लावण्यात आल्या आहेत. यापूर्वी शहरात 14 प्रभाग आणि त्यात प्रत्येकी दोन याप्रमाणे एकूण 28 नगरसेवक होते. नव्या आराखड्यात एक प्रभाग व त्यातील दोन नगरसेवकांची संख्या वाढली आहे. कोणत्या प्रभागात कोणता भाग आहे हे प्रारुप आराखड्यात स्पष्ट करण्यात आले असून त्यावर हरकती नोंदवण्यासाठी 17 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यावर 22 मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी होणार आहे.
ंसन 2011 च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या 65 हजार 299 असून प्रत्येक प्रभागात 4 ते 5 हजार लोकसंख्येचा समावेश आहे. मात्र, कार्यकर्त्यांनी व इच्छुकांनी नगर परिषदेत धाव घेत या रचनेवर आक्षेप घेत हरकती नोंदवण्याचा प्रयत्न केला. मात्र, या हरकती नेमक्या कोणाकडे नोंदवायच्या याबाबत नगर परिषद कार्यालयात कुणीही माहिती देत नसल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. मुख्याधिकार्यांच्या कार्यालयाला कुलुप असल्याने कुणाकडे जावे हेही कळत नव्हते. प्रत्येक कार्यालयातील सेवकांकडून याच्या-त्याच्याकडे बोट दाखवत जबाबदारी झटकली जात होती. हरकती नोंदवण्यासाठी फक्त 5 दिवस देण्यात आल्याने कार्यकर्त्यांची व इच्छुकांची धावपळ झालेली बघायला मिळाली.
नुतन प्रभागरचना
प्रभाग 1 मध्ये भैरवनाथ सोसायटी, मापारवाडी, खर्जे मळा, तळवाडी, प्रभाग 2 मध्ये कानडी मळा, विजयनगर, विद्यावर्धिनी नगर, प्रभाग 3 मध्ये उज्जल नगर, गणेशनगर, शंकरनगर, मुक्तेश्वरनगर, प्रभाग 4 मध्ये आंबेडकरनगर व सभोवतालचा परिसर, प्रभाग 5 मध्ये परिट गल्ली, सुतार गल्ली, फुले शाळा, प्रभाग 6 मध्ये नगरपरिषद परिसर, तानाजी चौक, प्रभाग 7 मध्ये, जोशीवाडी, माकडवाडी, गोंदेश्वर मंदिर, पंचायत समिती कार्यालय, प्रभाग 8 मध्ये गंगावेस, लाल चौक, प्रभाग 9 मध्ये साई दत्तनगर, देवी रोड, प्रभाग 10 मध्ये उद्योग भवन, देशमुखनगर, प्रभाग 11 मध्ये जीएमडी कॉलेज, लक्ष्मीनारायण लॉन्स, प्रभाग 12 मध्ये मधुर मिठास, रामनगरी, हॉटेल पंचवटी, प्रभाग 13 मध्ये वरंदळ मळा, लोहारकर हॉस्पिटल, नवजीवन शाळा, प्रभाग 14 मध्ये पांडवनगरी, ऋतुरंग पार्क परिसर, प्रभाग 15 मध्ये संगमनेर नाका, डुबरे नाका, परमसाई हॉस्पिटल या परिसरांचा समावेश आहे.




