अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
‘अल निनो’च्या प्रभावामुळे यंदा नगर जिल्ह्यात पाणीटंचाईचे भीषण संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. अद्याप सप्टेंबर महिन्याचा काही कालावधी शिल्लक असून, या काळात पावसाने जोरदार हजेरी लावल्यास पावसाची तूट काही प्रमाणात भरून निघू शकते. मात्र, पावसाचा खंड कायम राहिला आणि परतीच्या पावसानेही हात आखडता घेतल्यास जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून जिल्ह्यातील धरणांमध्ये उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्याचे नियोजन, पशुधनासाठी चारा निर्मिती तसेच पुढील वर्षीच्या पाणीटंचाई कृती आराखड्याची तयारी करण्याच्या हालचाली प्रशासनाकडून सुरू झाल्या आहेत.
यंदा जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट गंभीर होण्याची चिन्हे दिसत आहेत. जिल्ह्यातील सुमारे सात लाख हेक्टरवरील खरीप पिकांपैकी निम्म्यापेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांना पावसाच्या खंडाचा फटका बसला आहे. हवामान विभागाकडून दर आठवड्याला पावसाचा अंदाज वर्तविला जात असला, तरी वातावरणनिर्मिती होऊनही अपेक्षित पाऊस पडत नसल्याचे चित्र आहे.त्यामुळे अनेक तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
विशेषतः जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये आतापर्यंतच्या सरासरीच्या 50 टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस झाला आहे. यामध्ये राहुरी तालुका सर्वात तळाला असून, तेथे सरासरीच्या 30 टक्क्यांच्या आत पाऊस झाला आहे. राहाता, संगमनेर, नगर, नेवासा, पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यांमध्येही पावसाची स्थिती चिंताजनक आहे. उर्वरित तालुक्यांमध्ये अकोलेचा अपवाद वगळता अनेक ठिकाणी आतापर्यंतच्या सरासरीच्या 70 टक्क्यांच्या आतच पाऊस झाला आहे. पुढील 15 दिवसांत जिल्ह्यात दमदार पाऊस न झाल्यास परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 5 ऑक्टोबरनंतर जळालेल्या पिकांचे पंचनामे करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. त्याच पार्श्वभूमीवर जून ते सप्टेंबर या कालावधीतील पावसाचे प्रमाण आणि उपलब्ध पाणीसाठा यांचा आढावा घेत संबंधित तालुका टंचाईग्रस्त घोषित करण्याबाबत निर्णय होणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांतील पावसाची स्थिती महत्त्वाची ठरणार असल्याचे महसूल विभागाकडून सांगण्यात आले.
पाणीसाठ्याचे पुढील ऑगस्टपर्यंत नियोजन
15 ऑक्टोबर रोजी धरणांमध्ये उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्याचा आढावा घेऊन पुढील वर्षी ऑगस्ट 2027 पर्यंतच्या पाण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. सध्या ऐन पावसाळ्यातच काही धरणांमधून पाण्याचे आवर्तन सुरू करण्याची वेळ आली आहे. पुढील महिनाभरात समाधानकारक पाऊस न झाल्यास धरणांमधील पाणी पिण्यासाठी, शेतीसाठी आणि औद्योगिक वापरासाठी राखीव ठेवण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली.
हायड्रोपोनिक पद्धतीने चारा निर्मिती
पशुधनासाठी उपलब्ध असलेला चारा किती दिवस पुरेल, याचेही नियोजन करण्यात येत आहे. पाणी उपलब्ध असलेल्या ठिकाणी वैरण विकास कार्यक्रम राबविण्यासोबतच हायड्रोपोनिक पद्धतीने चारा निर्मिती करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
टंचाईग्रस्त तालुक्यांची बनावट यादी व्हायरल
दरम्यान, जिल्ह्यातील अनेक तालुक्यांची नावे असलेली टंचाईग्रस्त तालुक्यांची एक यादी शनिवारी समाजमाध्यमांवर व्हायरल झाली. या यादीत नमूद असलेल्या अनेक तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण अत्यल्प असले, तरी शासनाच्या निकषांनुसार जून ते सप्टेंबर या कालावधीतील पावसाच्या प्रमाणाचा आढावा घेतल्यानंतरच तालुका टंचाईग्रस्त घोषित केला जातो. सप्टेंबर महिना अद्याप पूर्ण झालेला नसल्याने पावसाचा अंतिम आढावा घेण्यासाठी काही कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे शासनाकडून अद्याप राज्यातील कोणताही तालुका अधिकृतपणे टंचाईग्रस्त घोषित करण्यात आलेला नाही. समाजमाध्यमांवर व्हायरल झालेली यादी अधिकृत नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
हा ट्रिगर ठरणार महत्त्वाचा
जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत पडणारा पाऊस सरासरीच्या 75 टक्क्यांपेक्षा कमी राहिल्यास संबंधित तालुका पाणीटंचाईग्रस्त तालुका म्हणून घोषित करण्याची तरतूद आहे. त्यामुळे सप्टेंबरअखेरपर्यंत होणारा पाऊस हा टंचाईग्रस्त तालुका निश्चित करण्यासाठी महत्त्वाचा ट्रिगर ठरणार आहे.
ऑक्टोबरअखेर टंचाई कृती आराखडा
महसूल विभाग आणि जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडून पुढील 30 जूनपर्यंतच्या संभाव्य पाणीटंचाईचा आराखडा तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. येत्या ऑक्टोबरअखेर जिल्ह्याचा पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडून गावनिहाय सूचना देण्यात आल्या आहेत.




