मालेगाव | प्रतिनिधी Malegaon
शहरासह तालुक्यात पावसाने गेल्या तीन दिवसापासून संततधार धरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. चणकापूर धरणातून ५ हजार ३४५ क्युसेस तर ठेंगोडा बंधार्यातून १८ हजार ८०० क्युसेस पाणी वाहत असल्याने गिरणा नदीस पुर आला आहे. पाणलोट क्षेत्रात पर्जन्यवृष्टी सुरूच राहिल्यास पुराच्या पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता असल्याने नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पर्जन्यवृष्टीमुळे चणकापूर धरणात १४६१ द.ल.घ.फुट सुमारे ६०.२० टक्के तर हरणबारी धरणात ७०९ द.ल.घ.फुट ६०.८१ टक्के व पुनद धरणात ५८४ द.ल.घ.फुट ४४.७३ टक्के जलसाठा झाला आहे. पावसाची संततधार सुरूच असल्याने चणकापूर धरणातून ५ हजार ३४५ क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. मालेगाव-मोसमखोर्यासाठी वरदान ठरलेले चणकापूर व हरणबारी धरणांनी अवघ्या पाच दिवसात अर्धशतकावर मजल मारल्याने जनतेत समाधानाचे वातावरण पसरले आहे.
जुन महिना कोरडाठाक गेल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले होते. पावसाने दिर्घकाळ ओढ दिल्याने अनेक गावच्या पाणीपुरवठा योजनाही संकटात सापडल्या होत्या. मात्र जुलैमध्ये प्रारंभी विस्तृत स्वरूपात झालेल्या पावसाने या पाणी योजनांना जीवदान मिळण्याबरोबर प्रलंबित खरीप पेरण्याचा मार्ग देखील मोकळा झाला आहे. ५ जुलैपासून शहरासह तालुक्यात पावसाचे सातत्य टिकून असल्याने आजअखेर ११३ मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे.
तुरळक पावसामुळे तालुक्यातील ९१ हजार हेक्टर खरीपाच्या क्षेत्रापैकी १८ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीपाच्या विविध पिकांची पेरणी झाली होती. मात्र गत चार दिवसापासून सुरू असलेला पाऊस पेरणीयोग्य झाला असल्याने पाऊस थांबत वाफसा आल्यास उर्वरित पेरण्या देखील पुर्ण होणार आहेत. खरीपाच्या पेरण्या येत्या १५ जुलैपर्यंत करता येतील. हा पाऊस थांबल्यास आठवडाभरात सर्व पेरण्या मार्गी लागण्याची शक्यता तालुका कृषि अधिकारी भगवान गोर्डे यांनी व्यक्त केली.
यापुर्वी मृग नक्षत्रावर अल्पशा पावसावर झालेल्या पेरण्यांना या पावसाने जीवदान मिळाले आहे तर कळवाडी, चिंचगव्हाण, दहिवाळ, पाडळदे, भिलकोट, शेंदुर्णी या जिरायत भागातही यापुर्वी पेरणी झालेल्या पिकांची अंतरमशागत मार्गी लागेल. झोडगे, अस्ताने आदी भागातील प्रलंबित पेरण्या या पावसाने पुर्णत्वास येण्याची शक्यता आहे. तीव्र पाणीटंचाईचा शाप असलेल्या काटवन भागातील वडनेर, खाकुर्डी, वळवाडे, कजवाडे आदी ठिकाणीही विस्तृत प्रमाणात पाऊस सुरू आहे. या पावसाने परिसरात जाणवणारी पाणीटंचाई काहीशी सुसह्य होण्याची आशा पल्लवीत झाली असल्याने ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.
घरांसह विहिरींची पडझड
गेल्या तीन दिवस सुरू असलेल्या या पावसाने तालुक्यातील गुगुळवाड येथील जिजाबाई वाल्मिक निकम यांचे विहिरीचे बांधकाम ढासळले तर लिलाबाई हरि खोमणे यांच्या घराची भिंत पडली. भाऊसाहेब दौलत निकम यांचा बैलही या पावसात दगावला तर वळवाडी येथील सुभाष भगवंत जोशी यांच्या घराची भिंत पडून नुकसान झाले. भीज पावसाने तालुक्यातील ग्रामीण भागात कच्ची मातीची घरे काही प्रमाणात बाधीत झाली.
गिरणा काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा
पाणलोट क्षेत्रात सर्वत्र होत असलेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे गिरणा, पुनंद व आरम नद्या दुथडी वाहत आहेत. पावसाच्या संततधारेने चणकापुर व पुनद धरणातून हजारो क्युसेस पाणी सोडण्यात आल्याने ठेंगोडा बंधार्यावरून १८ हजार ८०० क्युसेस पाणी वाहत असल्याने गिरणा नदीस मोठा पुर आला आहे. पाऊस थांबण्याची चिन्हे दिसत नसल्याने गिरणा नदीला मोठा पुर येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने नदीकाठच्या गावातील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता आर.एस. जगताप यांनी दिली आहे.




