अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
मुळा धरणातून होणार्या पाणी पुरवठ्याच्या पाणी पट्टीपोटी महापालिकेकडे तब्बल 11 कोटी 63 लाख 71 हजार 836 रुपये थकबाकी आहे. ती थकबाकी येत्या 20 फेब्रवारीपर्यंत जमा न केल्यास कोणतीही पूर्व सूचना न दता धरणातून होणार पाणी पुरवठा कधीही खंडित करण्यात येईल, असा इशारा जलसंपदा विभागाच्या मुळा पाटबंधारे विभागाने नुकताच दिला आहे.
आर्थिकदृष्ट्या चणचणीत असलेल्या महापालिकेच्या अडचणी याप्रकरणामुळे आणखी वाढणार आहेत. महापालिकेला शहर पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून दरवर्षी पाच ते साडेपाच कोटींचा तोटा होत आहे. तसेच पाणीपट्टी व मालमत्ता करातून मिळणारे उत्पन्न व होणार खर्च यात तब्बल 2 कोटी 61 लाख रुपयांची तफावत असल्याचे याचे महापालिकेने जाहीर केले आहे. एवढेच नाही तर यावर्षी महापालिकेला 446 कोटी 80 लाख देणी आहे. मात्र, उत्पन्न फारच कमी आहे. अशावेळी जलसंपदा विभागाने थकबाकी भरण्याबाबत नोटीस बजावली असून ती न भरल्यास पाणीपुरठव खंडित करण्याचा इशारा दिला आहे.
महापालिकेला देण्यात आलेल्या नोटीसीमध्ये म्हटले आहे की, 2024-25 या आर्थिक वर्षात अद्यापर्यंत महापालिकेने 21 लाख 30 हजार 646 रुपये रक्कम पाणीपट्टीची जमा केली आहे. उर्वरित थकबाकी भरण्याबाबत महापालिकेला वारंवार लेखी सूचना करण्यात आल्या आहे. मात्र, त्यांची महापालिकेने कोणतीही दखल घेतली नाही. थकबाकीची रक्कम वेळेत न भरल्यामुळे महापालिकेकडे अधिभाराची रक्कम वाढत आहे. त्यामुळे ही नोटीसच्या माध्यमातून कळविण्यात येत आहे की. येत्या 20 फेब्रुवारीपर्यंत थकबाकी न भरल्यास कोणतीही पूर्व सूचना न देता कोणत्याही क्षणी पाणीपुरवठा खंडित करण्यात येईल. त्यामुळे उद्धभवणार्या जनक्षोभास केवळ महापालिका जबाबदार राहिल असे स्पष्ट करण्यात आले आहे.
महापालिकेला जानेवारीपर्यंत पाणीपट्टी 10 कोटी 24 लाख 68 हजार 283.84, लोकल फंड 1 कोटी 2 दोन 65 हजार 175, दंडनीय आकार 20 लाख 17 हजार 853.80 तर अधिभार 16 लाख 20 हजार 523.69 अशी संपूर्ण थकबाकी 11 कोटी 63 लाख 71 हजार 836.38 रुपये आहे. दरवर्षी महापालिकेची थकबाकी वाढत आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने महापालिकेला आता थकबाकी न भरल्यास पाणीपुरवठा खंडित करण्याची नोटीस बजावली आहे.