Thursday, May 2, 2024
Homeनगरतालुक्यातील पाणीपुरवठा योजनांना मंजुरी- आ. कानडे

तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांना मंजुरी- आ. कानडे

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगावला 61 कोटी तर कडीत बुद्रूक व 5 गावांसाठी 32 कोटी 92 लाख रुपयांच्या पाणीपुरवठा योजनांना मंजुरी मिळाली असल्याची माहिती आ. लहू कानडे यांनी दिली.

- Advertisement -

आ. कानडे यांनी आज मुंबई येथे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन या मंजूरीबद्दल त्यांचे आभार मानले. निपाणी वडगाव, खोकर व त्याअंतर्गत येणार्‍या सर्व लोकवस्तींना कायमस्वरुपी शुध्द पाणी पुरवठा व्हावा म्हणून 61 कोटी 4 लाख रक्कमेच्या पाणीपुरवठा योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यामध्ये 161 दशलक्ष लीटर आरसीसी साठवण टँक, 3.50 दशलक्ष लीटरचे जलशुध्दीकरण केंद्र, 2 लाख 75 हजार लीटर क्षमतेचे उंच असे दोन जलसेतू जलकुंभ आणि 7 उंच पाण्याच्या टाक्या यांचा समावेश असून जवळपास 44 किमीची वितरण व्यवस्था इ. कामांचा समावेश आहे.

प्रशासकीय मान्यतेनंतर सदरच्या कामांची टेंडर प्रक्रीया सुरु झाली आहे. तसेच श्रीरामपूर मतदारसंघातील मुसळवाडी पाठोपाठ कडीत बु. व 5 गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाली असून त्यासाठी 32 कोटी 92 लाख रुपयांचा निधी मंजुर झाला आहे. सदरच्या कामाची टेंडर प्रक्रीया देखील सुरु झाली असल्याचे आ. कानडे यांनी सांगितले.

मतदारसंघातील सर्वच मोठ्या पाणीपुरवठा योजनांच्या कामांचा आ. कानडे यांनी पाठपुरावा केला, तीन दिवसांपुर्वीच उपअभियंता कांबळे, शाखा अभियंता हरदास व निकम या सर्वांची आ. कानडे यांनी निवासस्थानी बैठक घेत सदरची कामे तातडीने व गुणवत्तापुर्वक पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्याच्या सुचना दिल्या. दोन्हीही योजनांसाठी प्रवरा डावा तट कालव्यापासून कॅनॉल गेटद्वारे पाणी आणून साठवण तलावात साठवले जाणार आहे. कडीत व पाच गावांसाठी अंदाजे 8 किमी गेट आहे तर उंच जलसंतुलीत जलकुंभाची क्षमता 3 लाख 45 हजार लीटर एवढी आहे. तर 6 गावांसाठी 7 उंच टाक्या उभारल्या जाणार आहेत.

अस्तित्वातील एका साठवण तलावाची दुरुस्ती करण्यात येणार असून एक नवीन बांधण्यात येणार आहे. जलशुध्दीकरण केंद्रासाठी दोन्ही ठिकाणी सोलर सिस्टीमचे प्रावधान करण्यात येणार आहे. यामुळे सर्व गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सुटणार असल्याने आ. कानडे यांचे इंद्रनाथ पा. थोरात, अरुण पा. नाईक, ज्ञानेश्वर मुरकुटे, सतीश बोर्डे तसेच निपाणी वडगाव व कडीत बुद्रूक व इतर 5 गावातील ग्रामस्थांनी आभार मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या