मुंबई | Mumbai
गेल्या काही काळापासून मुंबईसह राज्यातील रिक्षाचालक आणि रॅपिडो बाईक-टॅक्सीमधील वाद सुरु आहे. स्थानिक रिक्षाचालकांकडून रॅपिडो बाईक-टॅक्सीचा विरोध केला जातो. अनेक रिक्षाचालक संघटनांनी रॅपिडो बाईक-टॅक्सीमुळे हजारो रिक्षाचालकांवर संकट असल्याचा दावा केला आहे. याच पार्श्वभूमीवर रिक्षाचालकांच्या शिष्टमंडळाने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेतली. या भेटीनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मंत्री प्रताप सरनाईक यांचे कौतुक केलं.
माध्यमांशी संवाद साधताना शिवसेना उबाठा खासदार संजय राऊत यांना या बैठकीबद्दल विचारले असताना ते म्हणाले की, “मला नक्की त्या बैठकीला जायला आवडले असते. राज्याचे प्रताप सरनाईक यांनी या प्रकरणात मार्ग काढण्याचा प्रयत्न केला, तो कौतुकास्पद आहे. त्याच्याबद्दल त्यांचे अभिनंदन. हजारो रिक्षा चालक हे राज्याच्या मंत्र्यांकडे जातात. तेव्हा सहानभुतीने विचार केला पाहिजे. याआधी रिक्षाचालकांना वाली नव्हता. ते राज्याचे परिवहन मंत्री असून त्यांनी समजून घेतला. आम्ही राजकीय भांडणे करत राहू, पण रिवहन मंत्री म्हणून त्यांनी रिक्षाचालकांचे म्हणणे ऐकून घेतले.” असे म्हणत त्यांनी प्रताप सरनाईक यांचे कौतुक केले.
६ खासदारांच्या फुटीनंतर ठाकरे गटाचा मोठा निर्णय; ४० मतदारसंघांत नेत्यांवर मोठी जबाबदारी
“परिवहन मंत्र्याने उत्तम काम केले असून त्यांनी रिक्षाचालकांच्या शिष्टमंडळाशी संवाद साधला. हे रिक्षाचालक महाराष्ट्रातील हजारो रिक्षाचालकांचे प्रतिनिधीत्व करत होते. तो प्रश्न याच व्यासपीठावरून मांडला. तो मांडताना परिवहन मंत्र्यांना कडक शब्द वापरले होते. गरीबांचे म्हणणे ऐकत नाही, असेही म्हंटले होते. तुम्ही रिक्षाचालकांना भेटत नाही, असेही म्हटले. यानंतर त्यांनी त्याची दखल घेतली आणि त्यावर चर्चाही केली. नंतर मार्ग काढला. रॅपिडो बाईक-टॅक्सी यामुळे हजारो रिक्षाचालकांवर आलेलं संकट आहे. हे संकट दूर करण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजे. मुख्यमंत्री, परिवहन मंत्री राज्याचे आहेत. आम्ही जाणार कोणाकडे…, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.”
‘मी भविष्यात मंत्री परिवहन मंत्र्यांना नक्की भेटणार. मी रिक्षाचालकांना म्हटलं की, तुम्ही भेटलात. एक संवाद सुरू झाला. हे योग्य आहे. त्यांचं म्हणणं होतं की, मी जात नसेल, ते जाणार नव्हते. त्यांना आदर मिळावा, अशी त्यांची मागणी होती. मी म्हटलं, असं होत नाही. तुम्हाला बोलावलं असेल, तर त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. असं बहिष्कार टाकून चालत नाही. ते मंत्री आहेत. सरकार आहे. त्यांच्याशी बोला. त्यांचे बरेचशे प्रश्न मंत्री सरनाईक आणि परिवहन आयुक्तांनी मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. रिक्षाचालकांच्या शिष्टमंडळाचं समाधानही झालं. मी त्यांना सांगितलं की, अडचण झाल्यास नंतर मी नेतृत्व करेल, असे राऊतांनी पुढे सांगितलं.




