अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
यंदा पावसाने दिलेली ओढ आता भूगर्भातील पाणीसाठ्यावरही घाव घालू लागली आहे. पावसाळ्याच्या अखेरीसच जिल्ह्यातील भूजल पातळीत गेल्या पाच वर्षांच्या सप्टेंबर महिन्यातील सरासरीच्या तुलनेत तब्बल 2.80 मीटरची घट नोंदविण्यात आली आहे. जिल्ह्यातील 202 निरीक्षण विहिरींपैकी तब्बल 173 विहिरींची पाणीपातळी खालावली आहे. त्यामुळे पावसाळा संपताच भूगर्भातील पाणीसाठ्याने तळ गाठण्यास सुरुवात केली असून आगामी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची चिन्हे आहेत.
विशेष म्हणजे, हे निरीक्षण सप्टेंबरअखेरचे आहे. जानेवारी आणि मार्चमध्ये होणार्या भूजल सर्वेक्षणात पाणीपातळी आणखी खोल जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑक्टोबर 2026 ते जून 2027 या नऊ महिन्यांच्या काळात जिल्ह्यातील अनेक गावांना पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागू शकतात. विहिरी, कूपनलिका आणि बोअरवेलवर अवलंबून असलेल्या ग्रामीण भागासाठी हा अहवाल धोक्याची घंटा मानला जात आहे. आकडेवारीनुसार, गेल्या 5 वर्षांतील सप्टेंबर महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत यंदा भूजल पातळी 2.80 मीटरने खाली (तळाला पाणीसाठा) गेली आहे. ही आजवरची सर्वात मोठी घट असून यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात पाण्यासाठी तीव्र संघर्ष करावा लागण्याची चिन्हे आहेत. सप्टेंबर महिन्यातील 202 विहिरींचे निरीक्षण करण्यात आले होते. यापैकी 173 विहिरींमध्ये जलपातळी खालावल्याचे निष्पन्न झाले आहे. या घसरत्या भूजलपातळीमुळे ऑक्टोबर 2026 ते जून 2027 या 9 महिन्यांच्या काळात जिल्ह्यातील सर्वच गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
पावसाची तूट; भूजलावर परिणाम
यंदाच्या खरीप हंगामात पावसाचे प्रमाण आणि पावसातील खंड याचा थेट परिणाम भूजल पुनर्भरणावर झाला आहे. अनेक भागांत पावसाने ओढ दिल्याने विहिरी, कूपनलिका आणि इतर भूजल स्रोतांवर मोठा ताण निर्माण झाला आहे. त्यामुळे आगामी रब्बी हंगामासाठी सिंचनाच्या पाण्याची उपलब्धता हा गंभीर प्रश्न बनण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, 202 निरीक्षण विहिरींपैकी तब्बल 173 विहिरींची पाणीपातळी घटली असल्याने जिल्ह्यातील भूजलस्थितीचा धोक्याचा इशारा मानला जात आहे.
तालुकानिहाय स्थिती
अहिल्यानगर तालुक्यातील 20 निरीक्षण विहिरींपैकी 19 विहिरींच्या पाणीपातळीत घट झाली असून सरासरी घट 4.57 मीटर आहे. कोपरगावमध्ये 15 पैकी 10 विहिरींची पातळी घटली आहे. नगरनंतर संगमनेर तालुक्यातही मोठी घट असून 26 पैकी 21 विहिरींची पाणीपातळी खालावली आहे. जामखेड तालुक्यातील 11 पैकी 11 विहिरींमध्ये घट, अकोले तालुक्यातील 13 पैकी 13 विहिरींमध्ये घट, तर नेवासा तालुक्यातील 12 पैकी 11 विहिरींची पाणीपातळी कमी झाली आहे. पारनेरमधील सर्व 15 निरीक्षण विहिरींची पातळी मागील सरासरीच्या तुलनेत कमी झाली आहे. राहाता, राहुरी, श्रीगोंदा आणि शेवगाव तालुक्यांमध्येही भूजल पातळी घटल्याचे अहवालातून स्पष्ट होते. दुसरीकडे कर्जत, कोपरगाव, नगर, नेवासा, पाथर्डी, राहाता, राहुरी, संगमनेर, श्रीगोंदा आणि श्रीरामपूर या काही तालुक्यांमध्ये काही विहिरींमध्ये पाणीपातळीत वाढ झाली असली तरी एकूण चित्र चिंताजनक आहे.
80 विहीरींचे निरक्षण 3 मीटरच्या खाली
जिल्ह्यातील 202 निरीक्षण विहिरींपैकी 80 विहिरींमध्ये भूजल पातळी 3 मीटरपेक्षा अधिक खाली गेली आहे. तर 50 विहिरींमध्ये 2 ते 3 मीटर, 28 विहिरींमध्ये 1 ते 2 मीटर आणि 15 विहिरींमध्ये 0 ते 1 मीटरची घट दिसून आली आहे. तर 29 विहिरींच्या पाणी साठ्यात वाढ दिसून आली आहे.
अशी आहे स्थिती
अकोले – 1.92
जामखेड -4.78
कर्जत -2.78
कोपरगाव- 0.79
नगर – 4.87
नेवासा- 2.83
पारनेर – 1.98
पाथर्डी – 3.69
राहाता – 1.98
राहुरी – 3.07
संगमनेर – 2.13
शेवगाव – 3.88
श्रीगोंदा – 3.20
श्रीरामपूर – 0.69




