जालना | Jalana
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आगामी ३० मे पासून मनोज जरांगे पाटील आंदोलनाला बसणार अशी घोषणा केली आहे. यावरुन आता राज्य सरकारची कोंडी केली आहे. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन जरांगे पाटील यांची भेट घेतली. मात्र, या भेटीदरम्यान जरांगे पाटील यांनी लाड यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली.
मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला २९ तारखेपर्यंतची अंतिम मुदत दिली आहे. “मुंबई आंदोलनादरम्यान दिलेली आश्वासने ८ महिने उलटूनही पूर्ण झालेली नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाची फसवणूक केली आहे,” मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र का दिले जात नाही? ४ वर्षांत ओबीसींची संख्या ३० टक्के कशी वाढली? असे सवाल जरांगे-पाटलांनी उपस्थित केले.
ओबीसींचे नाही तर आम्ही आमच्या हक्काचे आरक्षण मागत आहोत
मनोज जरांगे-पाटील म्हणाले, “आम्ही ओबीसींचे आरक्षण मागत नाही. आम्ही आमच्या हक्काचे आरक्षण मागत आहोत. आमची लेकरे स्वतःचे शेत असूनही दुसऱ्यांच्या शेतात काम करतात. ऊस कामगार म्हणून कामाला जातात. सरकारकडून ज्यांच्या नोंदी नाहीत, त्यांना आरक्षण दिले जाते. ओबीसींचे नाही तर आम्ही आमच्या हक्काचे आरक्षण मागत आहोत. तुम्हाला काय वाटत आहे तेच मला कळत नाही. ओबीसी आरक्षणाला नेमका कोणता निकष लावला? आम्हाला तीनवेळा मागास सिद्ध केले तरी आरक्षण मिळत नाही. १९९४ मध्ये ओबीसींना कोणत्या आधारावर आरक्षण दिले?”
“आमच्याकडे गॅझेट आहे, तर आम्हालाही आरक्षण द्या. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र का दिले जात नाही? ४ वर्षांत ओबीसींची संख्या ३० टक्के कशी वाढली? हा ही मोठा प्रश्न आहे. सरकारने मोठ्या मनाने जीआर काढला. ओबीसी आरक्षणात काही जाती घातल्या. आंदोलन सुरू असताना २६ जाती घातल्या. आंदोलन आमचे, जाती घालता त्यांच्या. त्या सुद्धा ज्या बसत नाही. गरीब कोण आहेत? आरक्षणाचा मागास ठरवण्याचा निकष काय? गरीब म्हणून निकष लावला का? तसे असेल तर आम्ही तुम्हाला गरीब मराठे दाखवतो. मराठा समाजाला का आरक्षण द्यायचे नाही. मराठा समाजाकडे शाळा, कॉलेज, कारखाने आहेत म्हणून आरक्षण द्यायचे नाही का? असा काही निकष आहे का? मी तुम्हाला छगन भुजबळ यांच्याकडेही कारखाने दाखवतो. त्यांची जात बाहेर काढा,” असे आव्हान जरांगे-पाटलांनी दिलं.




